ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील विकास प्रकल्पांमुळे बाधित स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नांना एकत्रित व्यासपीठ देण्यासाठी मंगळवारी ठाण्यात सागरी भूमिपुत्र महासंघाची स्थापना करण्यात आली. या महासंघाच्या अजेंड्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा मुद्दा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नामकरणाच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलनाची दिशा ठरविण्याचे संकेत भिवंडीचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी कार्यक्रमात बोलताना दिले.

पुढील महिन्यात भूमिपुत्रांच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सागरी भूमिपुत्र महासंघाच्या स्थापना सोहळ्यात बोलताना म्हात्रे यांनी नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रश्न अनेक वेळा मांडण्यात आला आहे. त्यांचे नाव का द्यावे, हेही सांगण्यात आले.

दि. बा. पाटील हे राष्ट्रीय पातळीवरील नेते होते. त्यांनी खासदार म्हणून काम केले, विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली. म्हणून त्यांचे नाव द्यावे, असेही सांगण्यात आले. दि. बा. पाटील यांनी भुमिपुत्रांसाठी सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे ते आमच्या समाजाचा श्वास, अभिमान व स्वाभिमान आहेत. त्यामुळे कोणत्याही स्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव लागणार नाही, तोपर्यंत गप्प बसायचे नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

नामकरणासाठी पुढील काळात आंदोलनाची दिशा ठरविण्याचे संकेतही त्यांनी दिले. विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न केवळ नामकरणापुरता मर्यादित नसून भूमिपुत्रांच्या अस्मितेशी जोडलेला असल्याचे स्पष्ट केले. मुंबई महानगर प्रदेशात मोठमोठे विकास प्रकल्प येत असताना स्थानिकांच्या जमिनी घेतल्या जातात व त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून संबोधले जाते. परंतु आम्ही प्रकल्पग्रस्त का, आम्ही प्रकल्पमालक का होऊ शकत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

विकास प्रकल्प उभारण्यासाठी जमीन देणाऱ्या भूमिपुत्रांना त्या प्रकल्पातील रोजगार व व्यवसायाच्या संधींमध्ये योग्य सहभाग मिळतो का, याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गावठाण विस्ताराचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. २०१५ पर्यंतच्या झोपड्या कायदेशीर झाल्या. मात्र, भूमिपुत्रांच्या गावठाण विस्ताराचा प्रश्न अद्याप कायम आहे. शासन निर्णय होतात. मात्र, त्याचे कायद्यात रूपांतर कधी होणार, असा सवालही म्हात्रे यांनी उपस्थित केला.

लढ्याची धुरा म्हात्रेंकडे?

महासंघाच्या स्थापना सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. दि. बा. पाटील यांनी स्थानिकांसाठी आंदोलने केली व न्याय मिळवून दिला. आता ही जबाबदारी सुरेश म्हात्रे यांनी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भूमिपुत्रांनी एकवटून त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन पवार यांनी केले. स्थानिक व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न महासंघाच्या माध्यमातून मार्गी लागतील, असेही त्यांनी सांगितले.

प्रकल्पात भागीदार का नाही?

एमएमआर प्रदेशातील विकास प्रकल्पांसाठी स्थानिकांच्या जमिनी घेतल्या जातात. जमीन देणारे भूमिपुत्र मात्र प्रकल्पग्रस्त म्हणून ओळखले जातात. परंतु जमिनी देऊन आम्ही प्रकल्पग्रस्त का, आम्ही प्रकल्पमालक का होऊ शकत नाही, असा प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला. जमीन, रोजगार, व्यवसाय व विकास प्रकल्पांमधील स्थानिकांचा सहभाग याचा अभ्यास करण्याची घोषणा त्यांनी केली. भूमिपुत्रांच्या प्रश्नांचा पुढील महिनाभर अभ्यास करून त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

३९ संघटनांचे एकत्रित व्यासपीठ

ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर व मुंबई उपनगर या पाच जिल्ह्यांतील ३९ हून अधिक सामाजिक संघटना एकत्र येत सागरी भूमिपुत्र महासंघाची स्थापना करण्यात आली. या महासंघाची स्थापना बालयोगी सदानंद महाराज यांच्या उपस्थितीत गडकरी रंगायतन येथे झाली. आगरी, कोळी, कराडी, कुणबी, आदिवासी, भंडारी व बारा बलुतेदार समाजासह शेतकरी, मच्छीमार व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना या व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आहे. गावठाण विस्तार, कोळीवाडे, घरांची पुनर्बांधणी, जमीन, रोजगार व पुनर्वसनाचे प्रश्न महासंघाच्या अजेंड्यावर असणार आहेत. सिडको, एमएमआरडीए, एमआयडीसी, जेएनपीए, बुलेट ट्रेन, वसई-विरार-अलिबाग कॉरिडॉर, कोस्टल रोड व वाढवण बंदर यांसारख्या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या स्थानिकांच्या प्रश्नांवर महासंघ पाठपुरावा करणार आहे.

—

पुरस्काराने भूमिपुत्रांचा गौरव या सोहळ्यात पद्मश्री भिकल्या धिंडा यांना ‘आगरी रत्न भूमिपुत्र पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. म्हात्रे यांच्या वतीने त्यांना ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचा धनादेश देण्यात आला. पद्मश्री लक्ष्मण माने यांचा सन्मान करण्यात आला. महासंघाच्या लोगोचे अनावरण आणि तारपा वादनही यावेळी झाले.