मुंबई, ठाण्यापेक्षा वेगळे शहर अशी नवी मुंबईची गेल्या अनेक दशकांची ओळख आहे. हे शहर काँक्रीटचे असल्याची टीका काही वर्षांपूर्वी होत असे. दोन दशकांपूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांचे एक शिष्टमंडळ दिल्लीत तेव्हा संरक्षणमंत्री असलेले शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. या शिष्टमंडळात महापालिकेतील काही अभ्यासू नगरसेवकही होते. या सदस्यांसोबत चर्चा करताना पवारांनी नवी मुंबईची ओळख ही काँक्रीटची नगरी अशीच मर्यादित राहात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. पारसिकचे डोंगर पोखरून, खाड्या बुजवून हे शहर उभे केले गेले. या शहराचे भविष्य मात्र हिरवेगर्द असावे, अशी अपेक्षा तेव्हा पवारांनी व्यक्त केली होती.
पवारांच्या पक्षाच्या हाती असलेल्या या महापालिकेने गेल्या तीन दशकांत यासाठी प्रयत्नपूर्वक पावले उचलली. मुंबई महानगर प्रदेशातील उत्तमोत्तम उद्याने, हिरवे पट्टे वेगवेगळ्या उपनगरांमध्ये विकसित केले गेले. कचराभूमी बंद करताना त्या ठिकाणी म्हैसूरच्या उद्यानांना लाजवेल अशा पद्धतीचा सुरेख, नियोजित हिरवा पट्टा विकसित केला गेला. या शहरातील रहिवाशांनी वर्षानुवर्षे गणेश नाईक यांच्याकडे सत्ता सोपवली. सुरुवातीच्या काळात नाईक यांच्यावर डोंगर पोखरणारे नेते अशी टीका होत असे.
नाईक यांना ही टीका जिव्हारी लागे. राज्यात २००४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार येताच नाईक या सत्तेत मंत्री झाले. त्यानंतर नाईक आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांनी संपूर्ण शहरभर वृक्षारोपणाची एक मोठी मोहीमच हाती घेतली. त्याकाळी आमदार झालेले त्यांचे पुत्र संदीप दरवर्षी नित्यनेमाने वृक्षारोपणाचा ‘हिरवा उत्सव’ साजरा करत. सुरुवातीला काँक्रीटचे शहर असा बट्टा लागलेले हे शहर गेल्या काही वर्षांत तुलनेने ‘हिरवे’ झाले हे कुणालाही नाकारता येणार नाही. पाणथळ जागा, त्यावर येणारे दुर्मीळ पक्षी, मोकळ्या जागा टिकविण्यासाठी झालेले पद्धतशीर प्रयत्न, त्यालगत दरवर्षी शेकडो नव्या रोपांची होणारी लागवड, सार्वजनिक वापरासाठी दृष्ट लागतील अशा पद्धतीने तयार करण्यात आलेली उद्याने ही नवी मुंबईची अलीकडच्या काळातील ओळख आहे. लोकसंख्या वाढते तसे या शहरातही अनेक नवे प्रश्न उभे राहात आहेत.
तरीही मुंबई, ठाण्याच्या तुलनेत राहण्याजोगे असलेले शहर अशी नवी मुंबईची ओळख कायम आहे. यंदाच्या पावसाळ्यात मात्र या शहरात झालेली झाडांची हानी पाहून नवी मुंबईलाही ठाणे, डोंबिवलीप्रमाणे बेदरकार व्यवस्थेचा फास पडतोय का असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. या झाडांच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले असते, त्यांच्या अवतीभवती काँक्रीटचा फास आवळला गेला नसता, विकास कामांचे हादरे त्यांना बसले नसते आणि अशास्त्रीय पद्धतीने छाटणी झाली नसती तर यापैकी काही झाडांचा जीव वाचलाही असता. सजग व्यवस्था कधी उभी राहणार? मुंबई, ठाण्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे मोठ्या हिरव्या पट्ट्याचे वरदान लाभले आहे.
या हिरवाईचे चहूबाजूंनी लचके तोडणारी एक मोठी यंत्रणा येथे दिवसरात्र कार्यरत असते हा भाग वेगळा असला तरीही ठाण्याप्रमाणे असे हिरवे वरदान नवी मुंबईला लाभलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. गेल्या ४०-५० वर्षांत या शहरात प्रयत्नपूर्वक केलेल्या रोपणाचे हिरवे पट्टे आता उभे राहिले आहेत. त्यामुळे एक-एक झाड आता जपायला हवेत. अलीकडच्या काळात तसे होताना मात्र दिसत नाही. यंदा पावसाळ्यापूर्वी शहरातील हजारो झाडांची छाटणी केल्याचे दावे आता उद्यान विभाग करताना दिसतो. प्रत्यक्षात मात्र तसे चित्र नाही. झाडांचे आरोग्य जपण्यासाठी पावसाळ्यापूर्वी एखादी मोठी मोहीम हाती घेणे नवी मुंबईसारख्या आधुनिक आणि तुलनेने निटनेटक्या महापालिकेला सहज शक्य होते.
नवी मुंबई महापालिका ही काही ठाणे, डोंबिवलीप्रमाणे रामभरोसे चालणारी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील यंत्रणेकडून या कामांविषयी अतिरिक्त अपेक्षा बाळगणे गैर नाही. मात्र शहरातील उद्यानांची निगा राखणे या पलीकडे सार्वजनिक हिरवाई जोपासण्यासाठी ठोस काही करताना ही महापालिका दिसत नाही. वाशीसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागातील जुन्या झाडांच्या शास्त्रीय छाटणीचे प्रयत्नही यंदाच्या वर्षात झाले नव्हते. ज्या भागात लोकप्रतिनिधी आग्रही आहेत तेथे अशा मोहिमा राबविल्या जातात. याशिवाय गेल्या काही वर्षांत या शहरात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू झाले आहेत. या प्रकल्पांच्या अवतीभवती शेकडो झाडांचे आधीच बळी दिले गेले आहेत. काही पुनर्विकास प्रकल्पांना लागून काही झाडे अर्धमेल्या अवस्थेत नावाली उभी आहेत. त्यांचा कधीही जीव जाईल अशी अवस्था आहे.
ही झाडे जगावीत यासाठी महापालिका फार काही करताना दिसत नाही. गटारे, पदपथांची उभारणी करताना वृक्षांच्या मुळाभोवती काँक्रीटची आवरणे बिनधोकपणे टाकली जात आहेत. मुंबई, ठाण्याप्रमाणे अजूनही नवी मुंबईला रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा फारसा सोस लागलेला दिसत नाही. परंतु पदपथ, गटारे उभारताना झाडांची मुळे शाबूत राहतील अशी काळजीही फार कुणी घेताना येथे दिसत नाही. महापालिका आयुक्त डाॅ. कैलाश शिंदे हे शहरातील आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी खूपच आग्रही दिसतात. शहराच्या इतिहासात नोंदली जातील असे आरोग्य सक्षमीकरणाचे प्रकल्प त्यांनी राबविले. त्यांच्या या प्रयत्नांचे लोकसत्ताने कौतुकही केले. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरणासाठी आयुक्तांची ही धडपड वाखाणली जावी अशीच म्हणावी लागेल. मात्र शहरातील झाडांचे आणि पर्यायाने त्यातून मिळणाऱ्या प्राणवायूने नागरिकांचे आरोग्य धडधाकट राहावे यासाठी तितक्याच तळमळीने प्रयत्न होणे गरजेचे होते. दुर्दैवाने या वर्षी ते झाले नाहीत. अन्यथा शंभर एक झाडे अशी मेली नसती.
