ठाणे : जिल्हास्तरीय पाणथळ सनियंत्रण समितीने जिल्ह्यातील विविध पाणथळ जागांविषयी सादर केलेल्या सविस्तर अहवालामुळे नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील महत्त्वाच्या पाणथळीच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाले आहेत. फ्लेमिंगो पॉइंट, टी. एस. चाणक्य तलाव, लोटस लेक, ज्वेल ऑफ नवी मुंबई यांसह एकूण आठ ठिकाणे पाणथळ (संवर्धन व व्यवस्थापन) नियम, २०१७ नुसार पाणथळ म्हणून पात्र ठरत नसल्याचा निष्कर्ष समितीने नोंदवला आहे. या समितीने या सर्व ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी, उपग्रह नकाशे, उपलब्ध अभिलेख, सिडको तसेच महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरकडील माहिती आणि विकास आराखड्यांचा आधार घेत निष्कर्ष मांडले आहेत.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे, अनेक पाणथळ हे मूळतः नैसर्गिक नसून मानवनिर्मित किंवा कालांतराने बदललेल्या स्वरूपातील असल्याचे निष्कर्ष समितीने मांडले आहे. मात्र, या निष्कर्षांवर पर्यावरणवाद्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, समितीने पाणथळ जागांची व्याख्या संकुचित पद्धतीने लावल्याचा आरोप केला आहे. नवी मुंबईतील खाडी क्षेत्र परिसरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणथळींच्या जागा आहेत. या पाणथळींच्या जागा टिकविण्यासाठी गेली अनेक वर्ष पर्यावरणप्रेमी प्रयत्न करत आहे. दरम्यानच्या काळात यातील काही जागांवर निवासी तसेच वाणिज्य संकुले उभी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने प्रयत्न केले होते.

मात्र पर्यावरण प्रेमींनी आणि शहरातील नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे आणि पर्यावरण प्रेमींनी दिलेल्या कायदेशीर लढाईनंतर महापालिकेला एक पाऊल मागे येत पाणथळींच्या जागांवर विकास करण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळावा लागला होता. मात्र या नंतर या जागांचा पुन्हा एकदा अभ्यास व्हावा यासाठी ठाणे पाणथळ समितीच्या वतीने या जागांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. या समितीने या सर्व ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी, उपग्रह नकाशे, उपलब्ध अभिलेख, सिडको तसेच महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरकडील माहिती आणि विकास आराखड्यांचा आधार घेत एक सविस्तर अहवाल तयार केला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत नुकतीच एक बैठक पार पडली या बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, अनेक जलस्रोत हे मूळतः नैसर्गिक नसून मानवनिर्मित किंवा कालांतराने बदललेल्या स्वरूपातील असल्याचे निष्कर्ष समितीने मांडले आहे.

काही ठिकाणी पूर्वी भातशेती, मिठागर किंवा इतर वापर झाल्यानंतर ते विकास आराखड्यांत समाविष्ट करण्यात आले असून, त्यामुळे ते पाणथळांच्या निकषात बसत नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. एकूणच, ठाणे जिल्हास्तरीय समितीच्या या अहवालाने पर्यावरण संवर्धन आणि शहरी विकास यामधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येणार आहे. तर या समितीच्या निष्कर्षांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पर्यावरणप्रेमी आणि तज्ज्ञांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य स्तरावर या अहवालाचा पुनर्विचार होणार का आणि या महत्त्वाच्या जलस्रोतांचे संरक्षण कसे सुनिश्चित केले जाणार, हा प्रश्न आता अधिकच तीव्र झाला आहे. चौकट

कारणे काय ?

पाणथळ सनियंत्रण समितीने दिलेल्या अहवालानुसार संबंधित ठिकाणे पाणथळ म्हणून नाकारताना मुख्यतः तीन मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. अनेक जलस्रोत कृत्रिम किंवा मानवनिर्मित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पूर्वीचा जमीन वापर (भातशेती, मिठागरे, विकास आराखडा) सिडको व इतर संस्थांकडील विकास आराखड्यांतील वर्गीकरण याबाबत नमूद करण्यात आले आहे. जसे की फ्लेमिंगो पॉइंट संदर्भात हा परिसर विकास झोनमध्ये मोडत असून तेथे गोल्फ कोर्ससारख्या प्रकल्पांसाठी नियोजन सुरू असल्याचा उल्लेख अहवालात आहे. तर जुन्या माहितीनुसार या ठिकाणी मिठागर असल्याचे दिसून आल्याने मिठागरांची जागा पाणथळ म्हणून नोंद होऊ शकत नसल्याची नोंद केली आहे.

टी. एस. चाणक्य परिसरातील तलावाबाबतही विद्यमान संस्थात्मक वापर, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाच्या संदर्भांचा आणि पूर्वी मिठागर म्हणून वापरत असल्याचा आधार घेत पाणथळ दर्जा नाकारण्यात आला आहे. लोटस लेक हे पूर्वी भातशेतीसाठी वापरले गेलेले क्षेत्र असल्याचे आणि नंतर ते नवी मुंबई प्रकल्पांतर्गत हस्तांतरित झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे, तर ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ तलाव हा पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तयार केलेला कृत्रिम जलस्रोत असल्याने तो नैसर्गिक पाणथळ ठरत नसल्याचे समितीने म्हटले आहे. अशा पद्धतीचे निष्कर्ष देत या समितीने एकूण आठ पाणथळ जागांबाबत अहवाल जिल्हा प्रशासनासमोर मांडला आहे. यामध्ये या सर्व जागा विविध कारणांमुळे पाणथळ संवर्गात मोडत नसल्याची थेट शिफारस करण्यात आली आहे.

चौकट या पाणथळ जागांचा समावेश लोटस तलाव ( नेरुळ – नोड ), फ्लेमिंगो पॉईंट ( एन आर आई कॉम्प्लेक्स ), टी.एस.चाणक्य ( करावे ), ज्वेल ऑफ नवी मुंबई ( नेरुळ ), गणेश मंदिर तलाव करावे, गोठीवली खदान ( घणसोली ), जिजामाता बोट खाडी ( घणसोली ), निळजे तलाव ( कल्याण ) चौकट मे २०२५ मध्ये नेरुळ परिसरातील टी एस चाणक्य तलाव, फ्लेमिंगो पॉईंट या जागा पाणथळीच असल्याचे विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग यांनी याबाबतचा अहवाल सादर केला होता. तसेच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कादंळवन कक्ष, मुंबई यांनी हा स्थळ पाणी अहवाल लॉ ग्लोबल संस्था तसेच शासनाला दिल्याने या ठिकाणच्या जागा पाणथळीच असल्यावर शिक्कामोर्तब झाले होते. असे असताना देखील आता या समितीने दिलेल्या अहवालात या जागांना पाणथळ संवर्गात मोडता येणार नसल्याची शिफारस केल्याने एकंदरीतच सर्वच प्राधिकारणांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नवी मुंबई आणि कल्याण मधील काही जागांबाबत पाणथळ समितीने सर्वेक्षण करून जिल्हाधिकारी कार्यालयाला सविस्तर अहवाल सादर केला आहे. यात काही शिफारस करण्यात आल्या आहेत. मात्र या अहवालाचा अभ्यास करून पाणथळ जागांचे नियम, कायदेशीर प्रक्रिया आणि याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना यांच्या आधारे या पाणथळींच्या जागांबाबत निर्णय घेण्यात येईल.– डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे

पाणथळ समितीच्या या निष्कर्षांवर तीव्र आक्षेप आहे. पाणथळांची व्याख्या संकुचित पद्धतीने केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेल्या रामसर करारानुसार पाणथळ नैसर्गिक तसेच कृत्रिम, कायमस्वरूपी किंवा तात्पुरती, गोड, खारट किंवा खारवट पाण्याची सर्व प्रकारची जलक्षेत्रे समाविष्ट होतात. त्यामुळे केवळ ‘कृत्रिम’ किंवा ‘पूर्वीचा जमीन वापर’ या कारणांवर आधारित नकार देणे वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नाही. आपण किनाऱ्यावरील शहरे आहोत याचे आपण भान राखले पाहिजे. या पाणथळ जागांना हटवून आपण भविष्यातील पूरस्थितीला निमंत्रण देत आहोत. – रोहित जोशी, पर्यावरणवादी