ठाणे : नवी मुंबई येथील कोपरखैरणे भागात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या (एएनटीएफ) कोकण कृती विभाग पथकाने मेफेड्राॅन पावडर (एमडी) विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली. पथकाने त्यांच्याकडून ११ लाख ६० हजार रुपयांची एमडी पावडर आणि मोबाई जप्त केला आहे.
अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी राज्य सरकारने अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या पथकाकडून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाते. दरम्यान, या टास्क फोर्सच्या कोकण विभाग पथकाने अनेकांविरोधात कारवाई केली आहे. अशीच एक मोठी कारवाई नवी मुंबई शहरात करण्यात आली असून पथकाने या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.
मोहम्मद फैज अली खान (२४) आणि अल्ताफ मुन्ना शेख (२८) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून यातील मोहम्मद हा मुंबईतील ट्राॅम्बे भागातील रहिवासी आहे. तर अल्ताफ हा नवी मुंबईतील बोनकोडे येथील रहिवासी आहे. कोपरखैरणे येथील रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गावर अमली पदार्थ विक्री करण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोकण कृती पथकाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पथकाने मोहम्मद आणि अल्ताफ या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, पोलिसांना त्यांच्याकडे ५८ ग्रॅम वजनाचे ११ लाख ६० हजार रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ आढळून आले. त्यांच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
