ठाणे : नवी मुंबई येथील बेलापूर भागातील एका भूखंडावर महापालिकेमार्फत सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव असून आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सिडकोने भूखंड महापालिकेला हस्तांतरित केला आहे. परंतु वन मंत्री गणेश नाईक यांच्या नगरसेवकांच्या गटाने सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची जागा बदलावी किंवा प्रस्तावच रद्द करावा अशी भूमिका घेतल्याने मंदा म्हात्रे विरुद्ध गणेश नाईक असा वाद निर्माण झाला होता. मंदा म्हात्रे यांनी तर ‘मर्द असाल तर समोर येऊन लढा, दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढू नका’ असा अप्रत्यक्ष इशाराच नाईक यांना दिला होता. या सर्व वादानंतर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत भव्य रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणाच केली. इतकेच नव्हे तर रुग्णालयाचे नावही जाहीर केले. त्यामुळे मंदा म्हात्रे यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जाते.
नवी मुंबई येथील बेलापूरमधील सेक्टर १२ परिसरात प्रस्तावित सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. परंतु भूखंडावरून नवी मुंबईत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या जागेवर महापालिकेद्वारे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव होता आणि तो मंदा म्हात्रे यांनी पुढे नेला, ज्यामुळे सिडकोने हा भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित केला. परंतु हा भूखंड स्थानिकांनी विकसित केलेले आहे आणि फुटबॉल, क्रिकेटसारखे सामने व सराव येथे नियमितपणे चालतात. काही नागरिक आणि नगरसेवक हे मैदान सांभाळण्याच्या बाजूने आहेत आणि पर्यायी जागेवर हॉस्पिटल बांधण्याची मागणी करत होते. तसेच भाजपच्या एका गटाने हा प्रस्तावच रद्द करण्याची मागणी महासभेत केली होती. हे नगरसेवक गणेश नाईक यांचे समर्थक होते.
यास प्रत्युत्तर म्हणून मंदा म्हात्रे यांनी देखील गणेश नाईक यांच्या गटावर टीका करत नवी मुंबई कोणाची खासगी मालमत्ता नाही. ‘मर्द असाल तर समोर येऊन लढा, दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढू नका’ असा अप्रत्यक्ष इशाराच नाईक यांना दिला होता. तसेच प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला. ज्या नगरसेवकांनी प्रस्तावाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांची बेकायदा बांधकामे बाहेर काढण्याचा इशाराच म्हात्रे यांनी दिला होता. त्यामुळे भाजपच्या म्हात्रे आणि नाईक समर्थकांमध्ये विस्तवही जात नव्हता.
आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा…
अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने रविवारी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई येथील ओवे मैदानात करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी भाषणामध्ये नवी मुंबईत भव्य रुग्णालय उभारण्यात येणार असून त्याचे नाव गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या नावाने असेल अशी घोषणाच केली. फडणवीस यांच्या भाषणानंतर मंदा म्हात्रे यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जाते. तर आता गणेश नाईक यांची भूमिका रुग्णालयाबाबत मवाळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
