ठाणे : ठाणे जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) तब्बल १ हजार ७४५ कोटी किमतीचे कोकेन हे अमली पदार्थ जप्त केले. या कारावाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही एनसीबीच्या पथकाचे कौतुक केले. ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि नवी मुंबई शहरात झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भिवंडीतील एका गोदामामध्ये इतका मोठा साठा आढळून आला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात गोदामांचा वापर अमली पदार्थांच्या साठवणूकीसाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच ठाणे जिल्हा अमली पदार्थांचा अड्डा बनत आहे का असा प्रश्नही निर्माण होत आहे.

अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ऑपरेशन ‘व्हाईट स्ट्राईक’ अंतर्गत अमली पदार्थांच्या संघटित तस्करीविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत कोकेन या अमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले. या कारवाईसाठी मागील सहा महिन्यांपासून एनसीबीचे पथकाने गुप्त व्यवस्था तयार केली होती. तसेच तस्करांच्या सर्व हालचालींवर सातत्याने पाळत ठेवून होते. त्यानंतर पथकाने नवी मुंबईतील कळंबोली आणि भिवंडीतील राहनाळ भागात छापे टाकले. विशेष म्हणजे, गोदामाचा वापर करुन अमली पदार्थांच्या साठवणूकीचे आणि तस्करी सुरु होती. एनसीबीने या कारवाईत एकूण १ हजार ७४५ कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, नवी मुंबई, मुंब्रा-शिळफाटा भागात मोठ्याप्रमाणात गोदामे आहेत. उरण जेएनपीए, गुजरात येथून सुटणारी हजारो मालवाहू वाहने भिवंडी, मुंब्रा, नवी मुंबई शहरातील गोदामांमध्ये दाखल होत असतात. भिवंडी भागात अनेक गोदामे बेकायदेशीरपणे उभारण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्याला मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा या सारख्या मार्गांचे जाळे आहे. त्यामुळे तस्करांना रस्ते मार्गे अमली पदार्थांची तस्करी करणे शक्य होत असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत टिटवाळा येथे मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला होता. या छाप्यात अश्विनी पाॅल हिला अटक करण्यात आले. तिच्या घरामधून पाच ते सहा कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर मिरा भाईंदरमध्येही तरुण ‘झाॅम्बी’ प्रमाणे फिरत असल्याचे आढळून आले. त्यानंतर शहरात अमेरिकेप्रमाणे ‘झाॅम्बी ड्रग्ज’ची विक्री होत असल्याचे उघड झाले होते. नवी मुंबईत अनेकदा विदेशी विशेषत: अफ्रिकन देशातील नागरिकांचा अमली पदार्थांच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे आढळून आले आहे. या कारवाया आणि अमली पदार्थांच्या विळख्यानंतर ठाणे जिल्हा अमली पदार्थांच्या तस्करीचे अड्डे ठरत आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

एनसीबीची कारवाई

– अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबई येथील कळंबोली, सेक्टर केडब्ल्यूसी, केडब्ल्यूसी वेअरहाउसिंग कॉम्प्लेक्सजवळ एक वाहन अडविले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये कोकेनची १३६ पाकिटे जप्त करण्यात आली. या प्रत्येक पाकिटाचे वजन सुमारे एक किलोग्रॅम इतके होते. ही पाकिटे एका मोठ्या खोक्यात ठेवलेली होती. त्यात क्रिकेट पॅड्स आणि ग्लोव्हजचा वापर करून कोकेन लपवण्यात आले होते. या कारवाईत एका आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता, रोपीने भिवंडीतल्या एका मोठ्या गोदामाबाबतची माहिती पथकाला दिली. त्यानंतर पथकाने भिवंडी येथील राहनाळ गावातील लक्ष्मण कंपाऊंड परिसरातल्या गोदामात दुसरी कारवाई केली. या कारवाईत कोकेनची प्रत्येकी एक किलो वजनाची आणखी २१३ पाकिटे जप्त केली.

गोदामांचा वापर

– एनसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये कोकेन हे अमली पदार्थाच्या साठवणूकीसाठी गोदामाचा वापर झाल्याचे उघडकीस आले. हे अंमली पदार्थ भारतात आयात केलेल्या यंत्रांच्या कप्प्यामध्ये लपवून आणले जात होते. प्रत्येक पाकीट वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिथीनच्या ९ थरांमध्ये बंदिस्त करण्यात आले. त्यावर काळ्या तेलकट पदार्थाचा एक थर देखील लावला गेला होता. गोदामांमध्ये कोकेनच्या पाकिटांची साठवणूक केली जात होती. त्यानंतर तस्करांना पुरवठा केला जात असल्याचे कारवाईतून उघड झाले.