ठाणे शहर केवळ श्रीमंताचे नसल्याची आयुक्तांवर बोचरी टीका
वर्तकनगर, घोडबंदर परिसरात कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून रस्त्यांची कोटय़वधी रुपयांची कामे करत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला करण्याची रणनीती ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आखली आहे. शहरातील निवडक आणि श्रीमंत वस्तीत महापालिकेमार्फत रस्त्यांची आरास मांडली जात असून हे करत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी इतर भागांतील खड्डेही बुजवा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी जयस्वाल यांना लगावला आहे. हे शहर श्रीमंतांचे नाही याचे भान राखा, असा टोलाही जयस्वाल यांना लगावण्यात आला आहे.
ठाणे शहराच्या तुलनेत कळवा आणि मुंब्रा परिसरातील विकासकामांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड सातत्याने केली जात असते. मध्यंतरी कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत जयस्वाल यांनी कळव्याकडेही लक्ष द्यावे, असा टोला लगावला होता. त्यानंतर जयस्वाल यांनी कळव्याचा दौरा करत काही नव्या रस्त्यांच्या बांधणीची घोषणा केली आणि त्यानुसार निविदा प्रक्रियाही सुरू केली. असे असले तरी जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीविषयी राष्ट्रवादीतील एका मोठय़ा गटात कमालीची नाराजी असून महापालिकेचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून बिल्डराभिमुख सुरू असल्याची टीकाही या पक्षाचे काही नेते दबक्या सुरात करताना दिसत आहेत. ठाण्यात विजेवर धावणाऱ्या बसेस सुरू करण्याविषयी जयस्वाल कमालीचे आग्रही आहेत. हे करत असताना खासगी ठेकेदारास वातानुकूलित बसगाडय़ांचे मार्ग देऊ करण्याच्या जयस्वाल यांच्या निर्णयावरही राष्ट्रवादीने जोरदार टीका केली. तसेच पोखरण रस्ता क्रमांक दोनच्या काही भागाची निविदावरून जयस्वाल विरोधकांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील खड्डय़ांचा उल्लेख करत पक्षाचे नवे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याने येत्या काळात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
बचावात्मक राष्ट्रवादीचे ‘परांजपे’ अस्त्र
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा नगरसेवकांची नावे पुढे आल्याने गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेते बचावात्मक पवित्र्यात होते. एरवी कोणत्याही मुद्दय़ावरून आक्रमक होणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडही हल्ली सौम्य झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. असे असताना परांजपे यांच्या खांद्यावरून जयस्वाल यांच्यावर निशाणा साधण्याची तयारी राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे.
