महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली असतानाच, राष्ट्रवादीच्या २३ वा वर्धापन दिनानिमित्ताने ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी नगरसेवकांची संख्या २३ ने वाढवून ५९ वर नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन ठाणे पक्ष कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे, पालघर महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड या उपस्थित होत्या. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या २३ ने वाढवून ५९ वर नेण्याचा निर्धार शहराध्यक्ष परांजपे यांनी व्यक्त केला.

“पक्षाच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त एकत्र आलो आहोत. केवळ वर्धापन दिन साजरा करून थांबायचे नाही. तर महापालिकेची आगामी निवडणूक ताकदीने लढवायची आहे. महविकास आघाडीचा निर्णय मंत्री आव्हाड घेणार आहेत. पण, महाविकास आघाडीच्या भरवश्यावर आपण आपले काम थांबवायचे नाही. आपण सर्वांनी प्रभागनिहाय पक्ष वाढीसाठी संघर्षरत रहायचे आहे. महाविकास आघाडी झाली तर स्वागतच आहे. तरीही आपण सर्वांनी प्रत्येक प्रभागात जोरदार काम करायचे आहे. त्यासाठी पुढील आठवड्यापासून नवीन प्रभाग रचनेनुसार व्यूहरचना आखण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २३ वा वर्धापन दिन साजरा केला असल्याने आता आपण २३ नगरसेवक वाढविण्यासाठी काम करायचे आहे,” असे परांजपे यांनी सांगितले.