ठाणे : कळवा येथील खारेगाव भागातील रेल्वे उड्डाण पुलाच्या श्रेयवादावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगला असतानाच, कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी मुंब्रा परिसरात केलेल्या दौऱ्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेने राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या कळवापाठोपाठ मुंब्रा येथे पक्ष बळकटीला तर सुरुवात केली नाही ना अशा चर्चेला उधाण आले आहे. यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कळवा येथील खारेगाव भागातील रेल्वे उड्डाण पुलाच्या श्रेयवादावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षात गेल्या काही दिवसांपासून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. याचदरम्यान शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी कळव्यावर लक्ष केंद्रित केले. हा परिसर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या घोषणेने राष्ट्रवादीत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. यातूनच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. असे असतानाच राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या मुंब्रा परिसरात खासदार शिंदे यांनी शुक्रवारी दौरा केला असून या दौऱ्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक राजन किणे आणि काही पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे शिवसेनेने मुंब्रा परिसरात पक्षबांधणीला सुरुवात केल्याचे मानले जाते.

कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई आणि ठाणे हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ऐरोली – काटई -फ्री वे उभारण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सध्या सुरू असून अंतिम टप्प्यात असलेल्या या कामाची खासदार शिंदे यांनी पाहणी केली. त्यानंतर मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करण्याबरोबरच घरे रिकामे करण्यासंबंधी रेल्वे विभागाने नोटिसा बजावलेल्या नागरिकांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली.

मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलाच्या उभारणीत आलेल्या अडचणी आणि समस्या सोडविण्यात आल्या असून या कामाची पाहाणी केली. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या जागेवरील घरे रिकामे करण्यासंबंधी रेल्वे विभागाने नोटिसा बजावल्या असून यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांना धीर आणि दिलासा देण्यासाठी नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली. या दौरा करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. – डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना खासदार, कल्याण लोकसभा

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp corporator during shiv sena mp visit shiv sena mp dr shrikant shinde akp
First published on: 23-01-2022 at 00:53 IST