ठाण्यापेक्षा कळवा-मुंब्य्रातील रस्ते खड्डेमुक्त असल्याचा आव्हाडांचा दावा

डोंबिवली : ठाणे शहरासह सर्वच भागांतील रस्त्यांवर खड्डे पडतात. पण कळवा-मुंब्य्रातील रस्त्यांवर मात्र खड्डे पडत नाहीत. या भागातील रस्त्यांच्या कामासाठी येणारे सिमेंट-काँक्रीटचा दर्जाही तपासतो. तसेच खड्डेमुक्तीसाठी परिश्रम घ्यावे लागतात, तेव्हा हे चित्र दिसते, अशा शब्दांत राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. जिल्ह्यातील पालिका निवडणुकांच्या तोंडावर मंत्री आव्हाड यांनी केलेल्या विधानामुळे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असून त्याचबरोबर राष्ट्रवादीने शिवेसेनेविरोधात रणिशग फुंकल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमधून वाट काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. कल्याण-डोंबिवली, भिवंडी तसेच आसपासच्या शहरांतील रस्त्यांवरही खड्डे पडले असून या भागातील नागरिक खड्डय़ांच्या समस्येमुळे हैराण झाले आहेत. असे असतानाच राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

एकेकाळी कळवा-मुंब्रा भागातील रस्त्यांवर सर्वाधिक खड्डे असायचे. परंतु गेल्या दहा वर्षांत परिस्थिती आता बदलली आहे. गेल्या दहा वर्षांत ठाणे शहरासह सर्वच भागांतील रस्त्यांवर खड्डे पडतात. पण कळवा-मुंब्य्रातील रस्त्यांवर मात्र खड्डे पडत नाहीत. या भागातील रस्त्याच्या कामासाठी येणाऱ्या सिमेंट-काँक्रीटचा दर्जा तपासला जातो, तसेच खड्डेमुक्तीसाठी परिश्रम घ्यावे लागतात आणि ते आम्ही घेतो, अशा शब्दांत आव्हाड यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच आसपासच्या महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. या महापालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहे. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी विविध मुद्दय़ांवरून शिवसेनेवर निशाणा साधत आहे. त्यातच मंत्री आव्हाड यांनी खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून टीका केली असून त्यांच्या विधानामुळे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कल्याण जिल्ह्यातर्फे रविवारी कल्याण पश्चिमेतील रामदासवाडी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात पालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष अप्पा िशदे यांनी व्यक्त केला. तर प्रत्येक पक्ष पालिकेतील आणि प्रभागातील आपली ताकद अजमावू शकतो. त्यात गैर काही नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही राज्यात एकत्र असलो तरी, पालिका निवडणुकीच्यावेळी कोणताही गुंताळा नको म्हणून अशा प्रकारची चाचपणी राष्ट्रवादीतर्फे केली जात आहे, असे आव्हाड यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांच्या सूचक वक्तव्यावरून येणारी पालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ठाण्यात भाजपचे खड्डय़ांविरोधात आंदोलन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील खड्डे बुजविण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिल्यानंतरही शहरातील अंतर्गत आणि मुख्यमार्गावर खड्डे कायम आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. असे असतानाच खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून भाजपने सोमवारी घोडबंदर मार्गावर आंदोलन केले.

करोना नियमांचे उल्लंघन

डोंबिवलीतील एका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड रविवारी डोंबिवलीत आले होते. यावेळी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शंभरहून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनेकांच्या तोंडाला मुखपट्टी नव्हती. सामाजिक अंतराचे पालन केले गेले नव्हते. परिसरात पोलीसही उपस्थित होते. त्यांच्याकडून याविषयी कोणतीही कारवाई केली जात नव्हती. पालिका, पोलिसांच्या परवानग्या घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे संयोजकांनी सांगितले.