ठाणे : कळवा-मुंब्य्रात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना दाखविले जातेय पैशांचे आमिष | NCP leader Jitendra avhadmade serious allegations against the Shinde group amy 95 | Loksatta

ठाणे : कळवा-मुंब्य्रात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना दाखविले जातेय पैशांचे आमिष

ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातील प्रभावी नेत्यांना गळाला लावण्याची रणनिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून आखली जात आहे.

Jitendra-Awhad-2 (1)
जितेंद्र आव्हाड(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

कळवा-मुंब्य्रातील माजी नगरसेवकांना एक कोटी देण्याबरोबरच नगरसेवक निडणुकीत तिकीट देण्याचे आणि १० कोटी रुपयांची कामे देण्याचे आमिष खुलेआम पैसेवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून दिले जात असून हीच राष्ट्रवादी फोडण्याची पद्धत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी शिंदे गटावर समाजमाध्यमांद्वारे केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>>ठाणे: मुख्यमंत्री रमले शाळेच्या आठवणीत

ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातील प्रभावी नेत्यांना गळाला लावण्याची रणनिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून आखली जात आहे. मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवकांनी बंडाची तयारी करीत असून त्यांना शिंदे गटाचा पाठींबा असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे लोकमान्यनगर भागातील पक्षाचे प्रभावी नेते हणमंत जगदाळे यांच्यासह तीन नगरसेवकांचा शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश निश्चित मानला जात आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर एक संदेश प्रसारित करत शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा >>>अंबरनाथः धाडसी महिलेने बिबट्यापासून केले कुटुंबाचे रक्षण

पैशवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला एक कोटी देतो, तुझ्या पत्नीला एक कोटी देतो, अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरु झाले आहे. तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला १० कोटी रुपयांची कामे देतो. ही आहे राष्ट्रवादी फोडण्याची पद्धत, असा आरोप आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यावर बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 19:30 IST
Next Story
ठाणे: मुख्यमंत्री रमले शाळेच्या आठवणीत