scorecardresearch

ठाणे: फार तर २८ दिवस जेलमध्ये रहावे लागेल; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा व्यक्त केली अटकेची भीती

सीबीआय चौकशीचा फास आवळण्यासाठी माझ्यावर अठ्ठेचाळीस तासात दोन गुन्हे नोंदविण्यात आले असून न्यायालयासमोर चोवीस गुन्हे असल्याचे दाखविण्यात आले आहे.

jitendra avhad
राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड

सीबीआय चौकशीचा फास आवळण्यासाठी माझ्यावर अठ्ठेचाळीस तासात दोन गुन्हे नोंदविण्यात आले असून न्यायालयासमोर चोवीस गुन्हे असल्याचे दाखविण्यात आले आहे. पण, त्यातील बावीस गुन्हे निकाली निघाले आहेत. काय होईल, या सर्व प्रकाराने फार तर २८ दिवस जेलमध्ये रहावे लागेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. तसेच जेलमध्ये राहुन सुकलेली चपाती, चव नसलेली डाळ खावी लागेल. त्यापेक्षा अधिक दिवस ठेवताच येणार नाही. म्हणूनच आता आपण लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हे विधान केले.

हेही वाचा >>>सध्याच्या काळात बुद्धिवाद्यांचा तिरस्कार!; ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे मत

निवडणुका कधी घेण्यात येतील, हे सांगणे अवघड आहे. नवीन सरकारला जो पर्यंत निवडणुका अनुकूल आहेत, असे वाटत नाही. तो पर्यंत निवडणुका होण्याची शक्यता कमीच आहे आणि हे वातावरण नवीन सरकारला कधीच अनुकूल होणार नाही. कारण, महाराष्ट्रात जे घडत आहे. त्याकडे पाहिल्यास महाराष्ट्राची वाटचाल उत्तर प्रदेशाच्या दिशेने सुरु आहे. एखाद्यावरचा राग काढण्यासाठी त्याचे घर पाडायचे. त्याला गुन्ह्यात अडकवायचे, असे प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. कायद्याच्या आधी शिक्षा देण्याचे प्रकार घडत आहेत. एक महिन्यापूर्वी काय झाले ते सर्वांनाच माहित आहे. आता निवडणुका जिंकून देण्याची क्षमता असलेल्या आपल्या एका कार्यकर्त्याला आणि त्याच्या भावांना मोक्का लावून चक्क तुरुंगात डांबण्यात आले आहे. पण, ध्यानात ठेवा आंदोलनाशिवाय कार्यकर्ता जिवंतच राहू शकत नाही, असेही आव्हाड म्हणाले.

हेही वाचा >>>ठाणे: ट्रॅक्टरने चिरडल्याने आठ वर्षीय मुलीचा मृत्यू

एखाद्यावरचा राग काढण्यासाठी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कायद्याच्या आधी हे लोक शिक्षा सुनावत आहेत. दबाव आला की गुन्हा दाखल केला जात आहे. नंतर चौकशी केली जात आहे. पण, अटकेला घाबरुन कोणाच्या पायाशी लोळण घेणे आपणाला जमणार नाही आणि ते आपणाला शक्यही नाही. आपण लढण्यासाठी सज्ज आहोत. कार्यकर्त्यांनी लढण्यासाठी सज्ज रहावे. कारण, कार्यकर्ते सज्ज राहिले तरच मी कोणत्याही आघाडीवर लढू शकतो, त्यामुळे आता कार्यकर्त्यांना घाबरविणे आणि फसविण्याचे प्रकार सुरु होतील. त्यांच्या या जाळ्यात अडकू नका. या विरोधात आपणाला लढायचे आहे. त्यांच्याकडे पैसा खूप आहे पण, आपल्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते नाहीत. त्यांच्या या कृत्याचे उत्तर त्यांना विधानसभेत मिळणारच आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>कल्याण मध्ये पोलिसांचा खबरी असल्याचा ओराप करत रिक्षा चालकाचे अपहरण

चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचाही आव्हाड यांनी समाचार घेतला. फुले-आंबेडकर-कर्मवीरांनी भिक मागून शाळा सुरु केल्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. या प्रस्थापितांनी आम्हाला कधी शिक्षणच घेऊ दिले नव्हते. तरीही, फुले-आंबेडकर-कर्मवीर पाटलांनी आम्हा बहुजनांना शिक्षण दिले. महात्मा फुले हे त्यावेळेच्या टाटा पेक्षा श्रीमंत होते. त्यांनी स्व पैशाने शाळा सुरु केल्या. रयत शिक्षण संस्थेचे जाळे विणताना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गावोगावी फिरुन लोकवर्गणी गोळा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:च्या पैशांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या. पण, या प्रस्थापितांनी बहुजनांना भिकारी ठरविण्याचा चंग बांधला आहे. रयत शिक्षण संस्था आणि बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थेनेच गोरगरीबांची, बहुजनांची मुले सुशिक्षित केली, हेच या लोकांना सहन होत नाही. आता एमपीएससीच्या अभ्यासक्रमातून महाराष्ट्राचा इतिहास वगळण्यात आला आहे. त्यामागे कारण हेच आहे की फुले-आंबेडकरांचा इतिहास नव्या सनदी अधिकार्‍यांना कळला तर त्यांच्या मनात गोरगरीबांविषयी कणव निर्माण होते. तीच या लोकांना नको आहे. बहुजनांना मूळ प्रवाहातून बाजूला करण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणून सावध रहा, असेही त्यांनी सांगितले.

हे सरकार मोठ्या लोकांचे सरकार आहे. गोरगरीबांचे सरकार नाही. या सरकारने महाराष्ट्रावर आणि देशावर एवढे कर्ज आणले आहे की ती पुढील अनेक वर्षात फेडताच येणार नाही. त्यामुळे आता हे सरकार स्थिर असेल असे वाटत नाही. अन् स्थिर असले तरी आपली लढाई चालूच राहिली पाहिजे. सबंध महाराष्ट्रात आता सरकारविरोधात नाराजीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण आता मोटार सायकल रॅली, चौक सभा या माध्यमातून वातावरण निर्मिती केली पाहिजे. ठाणकेर सुशिक्षित आणि सुसंस्कृत पर्याय शोधत आहेत. आपण जर चांगले चेहरे देऊ शकलो तर ठाण्यावर प्रथमच राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला.

सरकारमधील मंत्र्यांनाच कृत्याचा पश्चाताप
रिदा रशीद या मुस्लीम महिलेच्या माध्यमातून मुस्लीमांमध्ये आव्हाड याच्या बद्दल संताप निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, मुस्लीम धर्मगुरुंनीच ही महिला मुस्लीम असू शकते का, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनीच आपणाला ‘लोक आम्हाला शिव्या देत आहेत. जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीत बाईला पुढे करुन असे करायला नको होते”, असे म्हणत असल्याचे सांगितले. शिवाय, सत्ताधारी पक्षातील 20 आमदारांनी आम्ही चुकीचे केले आहे, अशी कबुली दिल्याचा गौप्यस्फोटही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

संजय मंगो यांनी केंद्र आणि राज्यसरकारच्या काळ्या कृत्यांचा पाढा वाचून सुडाच्या राजकारणाचा बदला निवडणुकांच्या माध्यमातून घेण्याचे आवाहन केले. मुफ्ती अशरफ यांनी शिवकाळातील दाखले देत शिवाजी महाराजांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी शिवविचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. ज्ञानेश्वर दराडे यांनी महापुरुषांचे विचार आणि शरद पवार यांची कृती यांची सांगड घालून दाखविली. तर, मोहसीन शेख यांनी कार्यकर्त्यांना सोशल मिडीया हाताळण्याचे प्रशिक्षण दिले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-12-2022 at 18:26 IST