लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : भिवंडीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्याची जबरदस्त किंमत तेथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली, असा दावा करत सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगली घडवून पोलिसांचाच बळी द्यायचा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते. परंतु, ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडलेली या सरकारला आवडत नाही. कारण, या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. काल भिवंडीत जे काही झाले आणि त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्याची जबरदस्त किंमत तेथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली. २४ तासांच्या आत कोणाला काहीही कळू न देता त्यांची आज बदली करण्यात आली. या बदलीमागील कारण काय तर या सरकारच्या मनात जी दंगल होती. ती दंगल घडण्यापासून रोखण्यात आली आणि हे नारळ त्यांनी पोलीस उपायुक्ताच्या डोक्यात फोडले, असा आरोपही त्यांनी केला.

आणखी वाचा-कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल

सबंध महाराष्ट्रातील पोलिसांनी यातून धडा घ्यावा की, या सरकारचे नेमके उद्दिष्ट काय आहे? यांना तुमच्या मदतीने दंगली घडवायच्या आहेत अन् या दंगलींनंतर तुमचाच बळी द्यायचा आहे. ‘चीत भी मेरा; पट भी मेरा’, अशी अवस्था आहे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल, असेही त्यांनी म्हटले आहे.