ठाणे : कळव्यामध्ये दिड दिवसाच्या गणपतीच्या दर्शनाकरिता काही जणांच्या घरी तसेच सोसायट्यांमध्ये फिरत असताना लोक फक्त एकच मुद्दा मांडत होते. काहीही करा पण वातानुकूलित लोकल बंद करा. त्यामुळे या लढ्याच रुप मला आता वर्ग संघर्षाच्या लढ्यासारख दिसत असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट द्वारे व्यक्त केले आहे. तसेच माझ्या विरोधात गरळ ओकत आहेत. त्याच्याने मला काहीही फरक पडत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> ‘मी शिवसेना बोलते’, शिंदे गटाविरोधातील देखावा पोलिसांकडून जप्त; महाआरती करत गणेशोत्सव मंडळाने नोंदवला निषेध

मध्य रेल्वेच्या मार्गावर गर्दीच्या वेळेत सामान्य लोकल कमी करून त्याऐवजी सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित लोकलविरोधात प्रवाशांनी आंदोलन केले होते. या प्रवाशांच्या बाजूने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडत रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित लोकलच्या काही फेऱ्या रद्द करून त्याऐवजी सामान्य लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या. असे असले तरी सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेतील सर्वच वातानुकूलित लोकल बंद करून त्या इतर वेळेत चालविण्याची मागणी आव्हाड करीत आहेत. या संदर्भात त्यांनी कळव्यात प्रवाशांची एक बैठकही घेतली होती. यामुळे वातानुकूलित लोकलने प्रवास करणारा वर्ग त्यांच्यावर समाजमाध्यमातून टीका करू लागला असून या टिकेल आव्हाड यांनी ट्वीटद्वारे प्रतिउत्तर दिले आहे. गरीब माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. जगणार कसा याची लढाई आहे. गरीब कष्टकरी माणूस वातानुकूलित लोकल विरुद्ध भांडत नाही. तर स्वतःची आर्थिक स्थिती ओळखून जगता येईल की नाही हा विचार करुन तो अस्तित्वाची लढाई लढतोय. तो कोणाविरुद्ध लढत नाहीये तो स्वतःच्या अस्तित्वासाठी, जिवंत राहण्यासाठी झगडतोय, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. मी साध्या लोकलच्या बाजूने म्हणजेच ज्यांची संख्या ट्रेनने प्रवास करणाऱ्यांमध्ये ९० टक्के इतकी आहे, त्या सर्वसामान्य गरीब माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे उर्वरित १० टक्के ज्यांना वातानुकूलित लोकल हवी आहे, ते माझ्या विरोधात गरळ ओकत आहेत. त्याच्याने मला काहीही फरक पडत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.