राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका

कळव्यातील खाडीकिनारी भागात पारसिक चौपाटी उभारण्यासंबंधीचा पहिला प्रस्ताव आठ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने दिला होता आणि तो प्रस्ताव प्रत्यक्षात उतरविण्याचे काम तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले. त्यामुळे या प्रकल्पाशी काडीचा संबंध नसतानाही त्याचे श्रेय घेणाऱ्या शिवसेनेने ‘फेकूगिरी’च्या पातळीचा कळस गाठल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. गेल्या दहा वर्षांत कळवा-मुंब्य्राचा विकास झाला, त्या तुलनेत ठाणे शहराचा मात्र विकास झालेला नाही, असा आरोप करत शिवसेनेने शहरातील नागरिकांसाठी केलेले एखादे तरी ठळक काम दाखवावे, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

ठाणे महापालिका निवडणूक लक्षात घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत विविध प्रकल्पांचे श्रेय घेऊन आश्वासनाची खैरात केली. शिवसेनेच्या वचननाम्याची ठाण्यातील पत्रकार चिरफाड करतील, या भीतीपोटीच शिवसेनेने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन तिथे वचननामा जाहीर केला, असा आरोपही आव्हाड यांनी केला. ठाण्यातील पाणीटंचाईची समस्या अशीच राहिली तर पुढील दहा वर्षांत ठाण्याचे मराठवाडा होईल, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळेच ठाणेकरांसाठी धरण उभारू अशी घोषणा शिवसेनेने केली आहे. तसेच शाई धरण उभारण्यासंबंधीचा प्रस्ताव राष्ट्रवादीने पाठपुरावा करून त्यासाठी जागा मिळविली. मात्र महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने धरणाच्या कामात टक्केवारी मिळणार नाही म्हणून या महत्त्वाच्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ठाणेकरांना आजही हक्काचे धरण मिळू शकलेले नाही, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. पारसिक चौपाटी उभारण्यासंबंधीचा पहिला प्रस्ताव आठ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने दिला होता. या प्रस्तावाच्या कामाला वेग आणण्याचे काम तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आणि त्यामुळे ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र मिळणार आहे. त्याचबरोबर बांधकाम विकास हस्तांतरणाच्या माध्यमातून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सेंट्रल पार्क उभारणीचा प्रस्ताव मार्गी लावला. या सर्व प्रकल्पांशी काहीही संबंध नसतानाही शिवसेनेने त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे श्रेय राष्ट्रवादीला मिळेल म्हणून शिवसेनेने त्यात आडकाठी घातल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

शहराच्या तुलनेत कळवा-मुंब्य्राचा विकास

शहरातील ज्या भागात मते मिळत नाही, त्या भागाकडे लक्ष द्यायचे नाही, अशी शिवसेनेची आजवरची भूमिका राहिली असून ठाणे स्थानकातील रस्ता रुंदीकरणादरम्यान व्यापारी वर्गाला त्याचा अनुभव आला. कळवा-मुंब्रा परिसरातून शिवसेनेला मते मिळत नव्हती म्हणून त्या विभागाकडे शिवसेनेने दुर्लक्ष केले होते. मात्र गेल्या काही वर्षांत त्या भागाचा विकास राष्ट्रवादीने केला असून एवढे काम शिवसेनेलाही शहरात करता आलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला.