मीरा-भाईंदर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन जणांनी दावा केलेला असल्याने कुणाची निवड होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले असतानाच हे पद राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार लियाकत शेख यांना मिळाले आहे. शनिवारी पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विशेष महासभेत महापौर गीता जैन यांनी शेख यांच्या नावाची घोषणा केली. गेल्या दहा महिन्यांपासून हे पद रिक्त होते.
विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लियाकत शेख यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीचे आणखी एक नगरसेवक अशोक तिवारी यांनी या पदावर दावा केला. तिवारी हे राष्ट्रवादीचे नगरसेवक असले तरी त्यांनी सध्या भाजपशी घरोबा केला आहे. त्यामुळे तिवारी यांनी घेतलेल्या या भूमिकेमागे भाजपचाच हात होता हे स्पष्ट होते. गेल्या दहा महिन्यांपासून भाजपने राष्ट्रवादीला या पदापासून वंचित ठेवल्याने गटनेते बर्नड डिमेलो यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने १९ मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पीय महासभेत या पदाबाबत निर्णय घेण्याचे आदेश महापौरांना दिले. मात्र त्याच दरम्यान अशोक तिवारी यांनीही या पदावर दावा केल्याने महापौर काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती. या वेळीही महापौरांनी शेख यांची निवड न करता तिवारी यांना हे पद दिले असते तर राष्ट्रवादीकडून पुढील रणनीतीही निश्चित केली होती व खबरदारीचा उपाय म्हणून अशोक तिवारी यांच्यावर व्हिपदेखील बजावला होता. मात्र महापौरांनी या प्रश्नाला आणखी फाटे न फोडता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार लियाकत शेख यांची विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केल्याचे महासभेत घोषित केले, परंतु याप्रकरणी शासनाचे मार्गदर्शन घेतले जाईल, तोपर्यंत विरोधी पक्षनेतेपदी लियाकत शेख यांची निवड करत असल्याचे महापौरांनी जाहीर केले.