राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास दहा लाखांचे इनाम जाहीर करणारे भाजपचे जालना युवामोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल देहेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलिसांकडे केली. या संबंधीची लेखी तक्रार देऊन २४ तासात देहेरकर यांना अटक करण्याची मागणी केली. तसे केले नाहीतर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ठाणे महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर कारवाई कधी ? आमदार संजय केळकर यांची आयुक्तांकडे विचारणा

राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुजाता घाग यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात कपिल देहेरकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा गैरअर्थ लावून त्यांच्या विरोधात कपिल देहेरकर यांनी चिथावणी देणारे विधान केले आहे. आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यासाठी जमावाला चिथावणी देण्याचे काम देहेरकर यांनी केले आहे. देहेरकर यांनी जालना येथे आंदोलन करुन आव्हाड यांचे छायाचित्रही जाळले होते. त्यांनी केलेले कृत्य हे समाजविघातक असल्याचा आरोप करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी घाग यांनी तक्रारीत केली आहे. या तक्रारीच्याआधारे भादंवि कलम १६०, १५० (जिविताला धोका निर्माण करणे), १५३ (चिथावणी देणे), ११२ (अपराधासाठी लोकांना प्रेरीत करणे), ५०३, ५०४, ५०६ (ठार मारण्याची धमकी देणे) या कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्याचे घाग यांनी सांगितले.

हेही वाचा- ‘अदाणी समूहाच्या देशविदेशात शेकडो बोगस कंपन्या’; नसीम खान

जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सन्मान परिषदेमध्ये जे विधान केले आहे. ते अर्धवट दाखवून लोकांना चिथावणी देण्याचे काम सध्या काही समाजकंटकांकडून केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आव्हाड हे खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. महापुरुषांचा कलंकित इतिहास बदलण्यासाठी आव्हाड हे आग्रही आहेत. खरा इतिहास बाहेर आला तर अनेकांना पळता भुई थोडी होईल, याची जाणीव असल्यामुळेच आव्हाड यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणे योग्य आहे. पण, त्यांना ठार मारण्याची सुपारी देण्यापर्यंत या समाजकंटकांची मजल गेली आहे. त्यामुळे या समाजकंटकावर आगामी २४ तासात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. अन्यथा, आम्ही पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा घाग यांनी दिला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mahila congress demands that a case be registered against those who provoke jitendra awhad dpj
First published on: 06-02-2023 at 18:12 IST