scorecardresearch

ठाणे : “पहाटेपर्यंत संगीत आणि मद्य पार्ट्या…” येऊर परिसरातील लोकांच्या धिंगाण्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड संतापले

येऊरमध्ये दीडशेहुन अधिक बेकायदा हॉटेल्स आहेत. त्याठिकाणी पहाटेपर्यंत मद्याच्या पार्ट्या चालतात.

ठाणे : “पहाटेपर्यंत संगीत आणि मद्य पार्ट्या…” येऊर परिसरातील लोकांच्या धिंगाण्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड संतापले
येउरमध्ये बेकायदा हॉटेल्स (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

येऊर हे राहण्याला मिळालेले वरदान आहे पण, मर्यादेच्याबाहेर गेल्यावर सर्वच गोष्टींचा ऱ्हास होतो. येउरमध्ये दीडशेहुन अधिक बेकायदा हॉटेल्स असून त्याठिकाणी पहाटेपर्यंत संगीत आणि मद्य पार्ट्या सुरू असतात. याचा आता कुठेतरी अंत व्हायला हवा, असे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. येऊरमध्ये बेकायदा सुरू असलेले बारमध्ये मद्य, हुक्का विकला जातो, हे चित्र आम्हाला दिसते.पण, ज्यांना दिसायला हवे त्यांना ते कसे दिसत नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> लाचखोर सहाय्यक आयुक्त अटकेत ; बांधकामाला संरक्षण देण्यासाठी स्वीकारली लाच

ठाणे शहरातील येऊर परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. खरेतर इथे ज्यांनी जागा घेतल्या आहेत, तिथे त्यांनी घर बांधून शेती वगैरे करणे अपेक्षित आहे. परंतु या जागा आता लग्न सोहळ्यासाठी भाड्याने दिल्या जात आहेत. या लग्न सोहळ्यासाठी ५० हुन अधिक वाहने येतात. त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते, असेही ते म्हणाले.

येऊरमध्ये दीडशेहुन अधिक बेकायदा हॉटेल्स आहेत. त्याठिकाणी पहाटेपर्यंत मद्याच्या पार्ट्या चालतात. मोठ्या आवाजात संगीत सुरू असते. याविषयी वारंवार आवाज उठवत असून आता तर डोक्यावरून पाणी गेले आहे. राष्ट्रीय उद्यानाचे दरवाजे रात्री ८ ते १० च्या आत बंद केले जातात. येऊरचे दरवाजे मात्र उच्च न्यायालयाच्या विशेष परवानगीमुळे रात्री ११ वाजता बंद करण्यास मुभा आहे. त्यानुसार रात्री ११ वाजेपर्यत येऊर बंद व्हायला हवे. पण येऊर पहाटे ६ वाजेपर्यंत सुरू असते. येथील एकही बारला अग्निशमन दलाचा परवाना नाही. असे असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना बारचा परवाना दिला कसा आणि वन क्षेत्रात बारचा परवाना घेताच कसा येतो, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

हेही वाचा >>> ठाण्यात गारांचा पाऊस

येउरमध्ये मोठ्या विद्युत दिव्यांमुळे दिवस आहे की रात्र हे प्राण्यांना समजतच नाही. निसर्गाचे चित्र उलट होऊ लागल्याचे कोणी दर्शवत असेल तर ते म्हणजे वटवाघूळ. वटवाघूळ आहेत की नाही हे पाहण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञांना तिथे पाठवा. कारण येऊरमधून जवळपास वटवाघूळ हे नाहीसे झाले आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला. हे मी सगळं बोललो नसतो पण, आता खूप अति झाले आहे. ज्यांची ही जागा आहे, ते प्राणीच तिथे नसतील तर येऊरमध्ये मज्जा काय राहणार, अस प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

निसर्ग लुटता काम नये

येऊर हा माझ्या आवडीचा विषय असून या विषयी विधानसभेत मी गेली २० वर्षे बोलतोय. येउरमध्ये बाग, बगीचा, रात्रीची सफारी करा असे काही तरी करा, अशी मागणी अनेकदा केली आहे. पण, त्याकडे लक्ष द्यायचे नाही आणि केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून त्याला लुटालुटायचे हे योग्य नाही. निसर्ग लुटता काम नये. विधानसभा अध्यक्षांनी आदेश देऊनही कारवाई होत नसेल तर मला विधानसभेत  अजून बोलावे लागेल. येऊरच्या बाबतीत माझे वनमंत्री सुधीर मुंगनटीवार यांच्याशी बोलणे झाले, त्यांनी स्वतः सांगितले की आपण हे सगळे बंद करून टाकू. भले ते आमचे विरोधक असले तरी ते याबाबतीत तडजोड करणार नाहीत, त्यांचा स्वभाव मला माहित आहे. त्यांच्यासोबतच मंत्री मंडळातील इतर मंत्रीही याबाबत तडजोड करणार नाहीत, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 13:26 IST
ताज्या बातम्या