राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे आज, सोमवारी सकाळी ११ वाजता ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठाण्यातच असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात पवार हे दिवसभर तळ ठोकून बसणार असून यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच पवार यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>> वातानुकूलित लोकल फेऱ्यांविरोधात प्रवासी पुन्हा आक्रमक ; कळव्यातील बैठकीत आंदोलनाचा निर्धार

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे ठाण्यातील निवासस्थान असलेल्या नाद बंगल्यावरच ते जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. ही बैठक सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार असून याचदरम्यान दुपारी २ वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.शिवसेनेच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्ताबदल झाला असून या सर्वाचा केंद्रबिंदू ठाणे जिल्हा हा राहिला आहे. तसेच येत्या काही महिन्यात जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असतानाच शरद पवार हे अचानकपणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.