– लोकसत्ता खास प्रतिनिधी
देशातील वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी ठाण्यात आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. अच्छे दिनाची भाषा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महागाईवर उपाययोजना करीत नाहीत. या महागाईमुळे केंद्रातील भाजप सरकारने गोरगरीब जनतेचे सरणच रचले आहे, असा आरोप करीत कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला चक्क अंत्यसंस्काराचे साहित्य पाठविले.

गृहनिर्माण मंत्री ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लाकडे, मडके, फुले, कुंकू- अबीर, चटई अशी अंत्यसंस्काराच्या साहित्याची मांडणी केली होती. हे सर्व साहित्य एका गोणीमध्ये बांधून ते कुरियरद्वारे पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आले.

सामान्य जनता महागाईमुळे मेटाकुटीस आली आहे. गोरगरीब जनतेला काही दिवसात दोनवेळच्या अन्नाची भ्रांत निर्माण होणार आहे. श्रीलंकेत जशी स्थिती निर्माण झाली आहे, तशीच स्थिती भारतामध्येही थोड्याफार फरकाने निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच भाजप सरकार गोरगरीबांचे “सरण” रचत आहे. पण, गरीबांसाठी सरण रचणाऱ्या या भाजप सरकारचे सरण आता जनताच रचणार आहे. येत्या २०२४ ला या सरणाला “चूड” लावण्यात येणार आहे. याची जाणीव करून देण्यासाठीच आम्ही हे साहित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवित आहोत, असे खामकर यांनी यावेळी सांगितले.