राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोच्र्यामुळे शहरभर वाहतूक कोंडी; तब्बल दीड तास रस्त्यांवर वाहनांच्या रांगा
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांतील बेकायदा इमारती आणि झोपडपट्टय़ांकरिता सामूहिक पुनर्विकास (क्लस्टर) योजना राबविण्याच्या मागणीसाठी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापालिकेवर काढलेल्या मोच्र्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली. जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन घडवून आणण्याच्या अंतस्थ हेतूने काढण्यात आलेल्या या मोच्र्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिवसभर होते. जनतेच्या भल्यासाठी आंदोलन करण्याचा देखावा करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे नागरिकांचे हालच झाल्याने ठाणेकरांनी मोर्चेकऱ्यांच्या नावाने खडे फोडले.
ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा इमारती तसेच चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबवली जावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय ते महापालिका असा मोर्चा काढण्यात आला. या मोच्र्यात आठ ते दहा हजार लोक सहभागी झाले होते. ठाणे सेंट्रल मैदान, कोर्ट नाका, टेंभीनाका, जांभळीनाका, दगडी शाळा, अल्मेडा चौक, चंदनवाडी, महापालिका मुख्यालयसमोरील रस्ता यामार्गे मोर्चा काढण्यात आला. ऐन गर्दीच्या वेळेत एवढय़ा मोठय़ा संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरल्याने या संपूर्ण मार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. कळवा नाका,
कोर्ट नाका, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील चौक, जेल चौक, टेंभीनाका, जांभळीनाका, गडकरी रंगायतन, तलावपाळी, अल्मेडा चौक, चंदनवाडी, महापालिका चौक, नितीन जंक्शन आदी भागांत अभूतपूर्व वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. या मोच्र्याकरिता रस्त्याचा एका बाजूचा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. तसेच या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, मोर्चेकरी ठरलेल्या मार्गाऐवजी बाजूच्या मार्गावरून जात असल्याने तेथील वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला होता. ऐन दुपारी शाळेच्या वेळेत निघालेल्या मोच्र्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहने वाहतूककोंडीत अडकून पडली. या मोच्र्यामुळे सुमारे एक ते दीड तास शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना मात्र वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आल्याचे दिसून आले.
मोर्चा की शक्तिप्रदर्शन?
या र्मोर्चाची जाहिरात गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जथे ठाण्यातील सेंट्रल मैदानात दाखल होत होते. त्यातही कार्यकर्त्यांनी भरून येणाऱ्या बस पाहून अनेकांच्या भुवया उंचावत होत्या. कळवा तसेच मुंब्रा भागांतील नागरिकांची संख्या यात जास्त होती. त्यामुळे हा मोर्चा जनतेच्या मागणीसाठी होता की राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी, असा प्रश्न ठाणेकरांना पडला होता.