ठाणे : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ५५ रूपयांची दरवाढ करण्यात आली असून या दरवाढीविरोधात ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे-पालघर विभागिय अध्यक्षा ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली. यावेळी ठाणे शहराध्यक्षा सुजाता घाग आणि कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील यांच्यासह माजी नगरसेविकांसह कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडर उलटा ठेवून तसेच चुलीवर अन्न शिजवून मोदी सरकारचा निषेध केला.  मोदी सरकारचा निषेध, मोदी सरकार हाय हाय, वाह रे मोदी तेरा खेल; सस्ती दारू महंगा तेल अशा घोषणा दिल्या.

जगभरात देशाची ओळख ही अर्थव्यवस्थेच्या वाढीने अधोरेखित होत असते. अर्थव्यवस्था मजबूत असेल तर देशाची प्रगतीकडे वाटलाच सुरू राहते, उत्पादन व रोजगार निर्मिती प्रक्रिया सुरु राहते. पण, मोदी सरकारला याच्याशी काही देणेघेणे नाही. आज घरगुती गॅस सिलिंडरचे दर अकराशे रूपयांच्या घरात गेले आहेत. एकूणच भारताची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने सुरू झाली आहे, अशी टीका ऋता आव्हाड यांनी केली आहे.