ठाणे : बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप या दोघांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणीवपूर्वक अपशब्द काढून शिवभक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केले होते. या प्रकारानंतर त्यांच्याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले आहे. दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाले असून धीरेंद्र शास्त्री आणि आनंद स्वरुप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) पदाधिकारी नौपाडा पोलीस ठाण्यात गेले. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. धीरेंद्र शास्त्री आणि आनंद स्वरुप हे जाणीवपूर्वक दोन धर्म- जातीसमूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने अशी विधाने करतात, असा उल्लेख मनोज प्रधान यांनी आपल्या लेखी फिर्यादीमध्ये केला आहे.
सध्या कोणताही गुन्हा दाखल करताना राजकीय इच्छाशक्तीची मर्जी पोलिसांना राखावी लागत आहे. त्यामुळे या सरकारकडून आपल्या आराध्य दैवताचा अवमान सहन केला जाणार नाही, अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही, असे वाटते. दुसरे महत्वाचे महाराजांचा अवमान जरी सत्ताधाऱ्यांनी सहन केला तरी आम्ही शिवभक्त हा अवमान सहन करणार नाही. हा धिरेंद्र शास्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांना धडा शिकवू, असा इशाराही जिल्हाध्यक्ष प्रधान यांनी दिला.
यावेळी युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, आशिष उमासरे, प्रवीण कडलक, महेश मोरे, राजेश मिश्रा, सचिन पंधरे, विश्वास चव्हाण, ज्ञानेश्वर राजपंके, साहिल उदुगडे, शिवा कालुसिंह, महेश भाग्यवंत, रेश्मा भानुशाली, निलेश जाधव, सचिन भातंभरे, श्रीकांत बर्वे, विष्णू माने, निलेश सावंत, खंडू लक्ष्मण पासनकर, धर्मेंद्र अस्थाना आदी उपस्थित होते.
