scorecardresearch

ओमी भाजपमध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसचा ‘हात’!

या बैठकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला आणि राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव उपस्थित होते.

ओमी भाजपमध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसचा ‘हात’!

स्वबळाच्या घोषणेवरून दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे घुमजाव

उल्हासनगरच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळविण्यात यशस्वी ठरलेल्या ओमी कलानी यांनी भाजपची वाट धरल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसची केविलवाणी अवस्था झाली आहे. त्यामुळेच यापूर्वी काँग्रेसला खिजगणतीतही न मोजणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता आघाडीसाठी चर्चा सुरू केली आहे. नुकतीच उल्हासनगरमधील एका तारांकित हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांनी प्राथमिक चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शहरातील राजकारण टीम ओमी कलानी यांच्याभोवती फिरत असून त्यामुळे युती आणि आघाडीचा निर्णय होत नसल्याची परिस्थिती होती. मात्र दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहरात स्वबळावरच लढेल असे सांगून काही इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. मात्र स्वबळाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीतर्फे दुसऱ्याच दिवशी कॉंग्रेसशी आघाडी करण्यासाठी एका हॉटेलमध्ये मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे स्वबळावर लढणाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादीला दुसऱ्याच दिवशी आघाडीचा साक्षात्कार कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, उल्हासनगर शहरातील सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या कलानी महालात इच्छुकांनी राष्ट्रवादीच्या तिकिटासाठी सोपस्कार पार पाडत मुलाखती दिल्या खऱ्या, मात्र टीम ओमी कलानीचा भाजप प्रवेश निश्चित असल्याने ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा रोष ओढवून घेणे नको म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून चर्चा केल्याचे सांगितले जाते. या बैठकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला आणि राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव उपस्थित होते. मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती कलानी यांना डावलून आघाडीची चर्चा करीत असल्याचे शहरात बोलले जात होते.

काँग्रेसची ‘वजनवाढ’

ओमी कलानीसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील विद्यमान नगरसेवकांसह प्रसिद्ध चेहरे व वजनदार नेतेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची कुणकुण लागल्यानेच सर्व जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आघाडीसाठी राष्ट्रवादीची धावपळ सुरू झाल्याचे बोलले जाते. मात्र, काँग्रेसतर्फे कोणताही आघाडीचा प्रस्ताव आला नव्हता, असे हिंदुराव यांनी सांगितले. तसेच प्राथमिक चर्चेनंतर जागा वाटपाविषयी बोलणी केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे फुटीच्या उंबरठय़ावर असलेली राष्ट्रवादी सावरण्यासाठी आता आघाडीची मदत घेतली जाते आहे का, असा सवालही उपस्थित होतो आहे. मात्र काँग्रेसला दुय्यम समजून आघाडी नाकारणाऱ्या राष्ट्रवादीनेच आघाडीसाठी पुढाकार घेतल्याने काँग्रेसचेही वजन वाढल्याचे बोलले जाते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2017 at 02:31 IST

संबंधित बातम्या