सात सदस्यांच्या जोरावर परिवहनमध्ये शिरकाव; विधान परिषद डोळयांसमोर ठेवून राष्ट्रवादीची छुपी मदत
ठाणे महापालिकेच्या परिवहन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेल्या मदतीच्या आधारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने अनपेक्षितपणे विजय मिळवला. उपलब्ध जागांपेक्षा अधिक उमेदवार असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता असलेल्या या निवडणुकीत प्रत्यक्षात विधान परिषदेच्या निवडणुकीचे आडाखे बांधून मतदान झाल्याचे दिसून आले. विधान परिषदेसाठी आपला उमेदवार निवडून आणताना मनसेची मते महत्त्वाची ठरतील, हे गृहीत धरून राष्ट्रवादीने आपल्याच चौथ्या उमेदवाराला डावलून मनसेच्या उमेदवाराला मतदान केले. तर दुसरीकडे स्वत:च्याच पक्षातील दोन नगरसेवकांच्या पूर्ण मतांचे गणित जुळवण्यात अपयश आल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या पवन कदम यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
परिवहन समितीच्या १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सात, राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. शिवसेनेने पुरेसे संख्याबळ नसतानाही इतर पक्षांमधून मिळणाऱ्या मतांच्या आधारे आठ जागा निवडून आणण्याची रणनीती आखली होती. मात्र त्यात त्यांना अपयश आले. तर मनसेचे जेमतेम सात सदस्य असताना राष्ट्रवादीने पुरविलेल्या मतांच्या रसदेच्या जोरावर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेश मोरे विजयी झाले. मागील काही निवडणुकांमध्ये सातत्याने मतविभाजनामुळे चर्चेत राहिलेल्या काँग्रेसने मात्र या निवडणुकीत एकजूट दाखवली. त्यामुळे या पक्षाचे उमेदवार सचिन िशदे सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले.
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली ठाणे परिवहन समिती सदस्य पदाची बहुचर्चित निवडणूक शुक्रवारी घेण्यात आली. परिवहन समितीमधील १२ जागांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत १५ उमेदवार उभे होते. त्यामुळे निवडणुकीत घोडेबाजार होणे निश्चित होते. या निवडणुकीत एका नगरसेवकाला १२ मतांचा अधिकार असतो. मतदानाच्या प्रक्रियेत शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक गैरहजर राहिल्याने शिवसेनेला १२ मतांना मुकावे लागले. तर दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले राजा गवारी यांचे नगरसेवकपद दोनच दिवसांपूर्वी रद्द करण्यात आल्याने सेनेला आणखी १२ मतांचे नुकसान सोसावे लागले. सेनेचे सात उमेदवार अपेक्षेप्रमाणे निवडून आले, मात्र पवन कदम यांना मतांचे गणित जुळवता आले नाही.
महापालिकेत राष्ट्रवादीप्रणीत लोकशाही आघाडी असून त्यामध्ये काँग्रेस, मनसे, रिपाइं (एकतावादी) आदी पक्षांचा समावेश आहे. मात्र ही निवडणूक प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे लढविण्याचे निश्चित केले. राष्ट्रवादीने निवडणुकीत चार उमेदवार उतरवले होते. पक्षाकडे ठरवून दिलेल्या कोटय़ापेक्षा पाच नगरसेवकांची ६० मते अतिरिक्त होती. त्यामुळे ही मते चौथ्या उमेदवाराला दिली जातील की अन्य कुणाकडे वळतील, याविषयी उत्सुकता होती. प्रत्यक्षात मतमोजणी नंतर राष्ट्रवादीचे सुरेंद्र उपाध्याय, हेमंत धनावडे, तकी चेऊलकर यांच्यासह मनसेचे राजेश मोरे विजयी झाल्याने ही मते मनसेकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, मनसेची २४ मते फुटल्याचेही मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल होऊन जामिनावर सुटलेल्या चौघा नगरसेवकांनी
या वेळी मतदानाचा हक्क बजाविला.
दरम्यान, राष्ट्रवादीने मनसेला मदत करून विधान परिषदेतील मतांची बेगमी केल्याची चर्चा आहे. मनसेचे सुधाकर चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर ही खेळी ठरल्याचे वृत्त आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीतील गणित लक्षात घेऊन मनसेकडून आलेला प्रस्ताव उचलून धरत आघाडीचे ‘डाव’खरे करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजयी उमेदवार
शिवसेना : साजन कासार, अनिल भोर, प्रकाश पायरे, राजू महाडिक, जेरी डेव्हिड, दशरथ यादव आणि संजय भोसले
’ राष्ट्रवादी : सुरेंद्र उपाध्याय, हेमंत धनावडे, तकी चेऊलकर
काँग्रेस : सचिन शिंदे. मनसे : राजेश मोरे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp support mns in thane municipal transport committee elections
First published on: 23-04-2016 at 06:42 IST