बदलापूर: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत काही प्रतिबंधात्मक गोष्टी झालेल्या नव्हत्या. शाळेकडूनही परिपत्रकानुसार उपाययोजना होणे आवश्यक होते. त्या गोष्टी झाल्या असत्या तर घटना टाळता आली असती, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मांडले. बदलापूर शहरातील चिमुकली अत्याचार प्रकरणानंतर त्यांनी बदलापुरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली.

यावेळी त्यांनी पूर्व प्राथमिक शाळांच्या जबाबदारीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे सुतोवाच केले. दक्षता समिती सक्रिय करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी पोलिसांना दिल्या. तर विद्यार्थ्यांची वाहने शाळेची जबाबदारी असून त्याबाबत कठोर तपासण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

बदलापूर शहरात गुरुवारी एका चार वर्षे चिमुकलीवर वाहन चालकाने वाहनातच अत्याचार केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपीला अटक करत गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकारानंतर पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळांची जबाबदारी आणि त्यांच्या वाहतुकीतील त्रुटींवर चर्चा सुरू झाली. याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात भेट देत प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना काही प्रतिबंधात्मक गोष्टी केल्या असत्या तर प्रसंग गाळता आला असता अशी कबुली दिली.

शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या उपायोजनांचे परिपत्रक चार वर्षांपूर्वीच जाहीर झालेले आहे. मात्र त्या गोष्टी झालेल्या नाहीत. या वाहनांमध्ये महिला परिचारिका आवश्यक होती. ती नव्हती त्याच दिवशी हे प्रकरण झाले. शहरातील महिलांच्या दक्षता समिती पुन्हा सक्रिय करण्याची गरज आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळणार नाही, असे प्रयत्न करण्याच्या सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत असे गोरे म्हणाल्या. पूर्वप्राथमिक शाळा कुणाच्या अखत्यारीत असाव्यात. याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. त्या शिक्षण विभागातच समाविष्ट करा यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

सखी सावित्री सारखे कार्यक्रम आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. या प्रकरणात शाळेचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसून येतो आहे. वाहनाची सेवा शाळेने घेतलेली होती. त्यामुळे शाळेतील वाहनचालक, त्यांचे कंत्राटदार यांची नोंदणी करणे गरजेचे आहे. चालक व्यसनाधीन आहे का, आरोपी का, यापूर्वी त्यांनी कोणते गुन्हे केले आहेत का, त्यांचे चारित्र्य पडताळणी करणेही गरजेचे आहे असेही मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

या वाहन चालकांनीही सर्व गोष्टींची नोंदणी करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी लवकरच बोलू तसेच धोरणात्मक योजनेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही चर्चा करण्याची तयारी त्यांनी दाखवली.

आम्ही कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. त्या मुलीचे शिक्षण सुरळीतपणे सुरू राहावे यासाठी प्रयत्न करणार आहे. बेकायदा वाहनांबाबत लवकरच कारवाई करू त्यासाठी परिवहन विभागाच्या सचिवांशी बैठक घेऊन असेही त्या म्हणाल्या.