ठाणे : नीट ही राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा येत्या रविवारी, ३ मे रोजी पार पडणार असून ठाणे जिल्ह्यातील २७ परीक्षा केंद्रांवर एकूण १२,८६२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. एनटीए मार्फत आयोजित या परीक्षेचे नियोजन पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समन्वय बैठकीत त्यांनी पोलीस, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, महावितरण तसेच महानगरपालिका या सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.

विशेषतः परीक्षा केंद्रांभोवती विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यावर भर देण्यात आला. केंद्रांजवळ ‘नो-पार्किंग’ क्षेत्र निश्चित करून पालकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्याचेही निर्देश देण्यात आले. परीक्षेची वेळ दुपारी २ ते सायंकाळी ५ अशी असून दिव्यांग विद्यार्थ्यांना सायंकाळी ६ वाजेपर्यंत अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल; दुपारी १:३० नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन केंद्रांवर पिण्याचे थंड पाणी, पालकांसाठी सावलीची व्यवस्था, प्राथमिक उपचार पेटी आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी हलके व आरामदायी कपडे परिधान करावेत, पुरेसे पाणी प्यावे आणि वेळेत केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

परीक्षेच्या नियमांनुसार मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच दागिने आणण्यास मनाई आहे. परीक्षेसाठी लागणारे पेन केंद्रामार्फत पुरवले जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी इतर साहित्य सोबत आणू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यावर्षी जिल्हास्तरीय समन्वयाची जबाबदारी शहर समन्वयक डॉ. दिनेश कांबळे (शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे) आणि वेदप्रकाश गौतम (केंद्रीय विद्यालय, कोलशेत) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.