ठाणे : हिमनदीचा भाग कोसळून आलेल्या महापुरामुळे नेपाळमध्ये मोठी जीवितहानी झाली असून, शेकडो नागरिकांचा बळी गेल्याने देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. ठाणे, टिटवाळा, मिरा भाईंदर, उल्हासनगर यांसह जिल्ह्यातील विविध भागांत वास्तव्यास असलेला नेपाळी समाज या आपत्तीमुळे व्यथित झाला आहे. मातृभूमीतील नागरिकांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील नेपाळी समाज एकवटला असून, मृतांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत उभारण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये महापुरामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. हिमनदीचा भाग कोसळल्याने आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून, काही नागरिक आणि पर्यटक बेपत्ता आहेत.

अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्घटनेची दृश्ये आणि त्याबाबतच्या बातम्या समाजमाध्यमांवर तसेच विविध वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र पाहून ठाणे जिल्ह्यातील नेपाळी नागरिकांमध्येही चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध भागांत सुमारे एक लाख नेपाळी समाजाचे नागरिक वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येते. रोजगाराच्या शोधात अनेक वर्षांपूर्वी नेपाळमधून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांनी ठाणे जिल्ह्यात आपले बस्तान बसवले. त्यांच्या पूर्वजांनी प्रामुख्याने सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अनेक वर्षांच्या वास्तव्यानंतर नेपाळी समाजाचा ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये विस्तार झाला आहे. आता या समाजातील तरुण पिढी शिक्षण घेत असून, व्यवसाय, खासगी कंपन्या, सेवा क्षेत्र यांसह विविध क्षेत्रांत कार्यरत आहे.

नेपाळमध्ये महापूर आल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील नेपाळी समाजातील नागरिकांनी एकमेकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. दुर्घटनेत बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये नेपाळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक मदत मिळावी यासाठी आर्थिक मदत उभारण्याबाबतही समाजातील विविध संघटनांमध्ये चर्चा सुरू आहे. मातृभूमीपासून हजारो किलोमीटर अंतरावर राहत असलो तरी नेपाळमधील नागरिकांशी आमचे भावनिक नाते कायम आहे.

त्यामुळे तेथील दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रत्येक नेपाळी नागरिकाला दुःख झाले आहे. आपल्या परीने पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय समाजातील नागरिकांनी घेतला आहे. आर्थिक मदतीबरोबरच गरज भासल्यास इतर स्वरूपाची मदत करण्याचीही तयारी असल्याचे समाजातील नागरिकांनी सांगितले. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात झाली असून, आगामी काळात या कार्यक्रमांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या माध्यमातून नेपाळमधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी निधी संकलित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

समाजातील विविध मंडळे आणि संघटनांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. चौकट – नेपाळमध्ये प्रचंड हानी झाली आहे. अनेकांचा बळी गेला आहे. अनेक कुटुंबांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकवटून मृतांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. मातृभूमीवर आलेल्या या संकटाच्या काळात तेथील नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. पूरग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लवकरच प्रयत्न करण्यात येणार आहेत.” – झंकार केहरसिंह, नेपाळी समाजातील रहिवासी, ठाणे