ठाणे : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे रासुवा आणि परिसरात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा फटका महाराष्ट्रातील नागरिकांनाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या तसेच पूरस्थितीनंतर ज्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, अशा महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित करण्यात येत असून, उपलब्ध यादीत ठाणे जिल्ह्यातील आठ आणि नवी मुंबईतील एका नागरिकाचा, अशा एकूण नऊ जणांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या नागरिकांपैकी अनेक जण कैलास-मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमार्गे चीनच्या सीमेकडे प्रवास करत होते. पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वी काही नागरिकांचा नेपाळ-चीन सीमेवरील इमिग्रेशन केंद्र किंवा त्याच्या आसपास शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर फ्लॅश फ्लड आणि निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नसल्याचे प्रशासनाच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.

ठाण्यातील रेखा सतीश पाटणकर आणि सतीश विनायक पाटणकर हे २७ जणांच्या समूहासोबत प्रवास करत होते. त्यांचा मंगळवारी रात्री शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ८.२७ वाजता समूहातील एका व्यक्तीने ते चिनी इमिग्रेशन पॉइंटवर पोहोचल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नसल्याचे नोंदविण्यात आले आहे.

अपर्णा समीर जोशी आणि समीर मुकुंद जोशी हे देखील कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता नेपाळ-चीन सीमेवर असताना त्यांचा शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर आलेल्या फ्लॅश फ्लडमुळे त्यांच्याशी संपर्क तुटल्याचे प्रशासनाच्या नोंदीत नमूद आहे. त्याचप्रमाणे डोंबिवलीतील सुनील सुदर्शन सुभेदार यांच्याशी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.२८ वाजता नेपाळ-चीन इमिग्रेशन कार्यालयातून शेवटचा संपर्क झाला होता.

कल्याण मधील संजय राजमल पाटील आणि नलिनी संजय पाटील हे पती-पत्नी कैलास-मानसरोवर यात्रेसाठी केरुंगमार्गे प्रवास करत होते. त्यांचा शेवटचा निश्चित ठावठिकाणा काठमांडूतील हॉटेल शंकर असल्याचे नोंदविण्यात आले आहे. २५ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांनी हॉटेल सोडले होते आणि त्यांचा नियोजित मार्ग काठमांडू-तिमुरे-रसुवागढी/चीन सीमा-केरुंग असा होता. २६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता रासुवा-भोटेकोशी परिसरात पूर आल्याची नोंद असून, त्यानंतर या दाम्पत्याचे सध्याचे ठिकाण निश्चित झालेले नसल्याचे समोर आले आहे.

याशिवाय राजनिश रघुनाथ नाटू यांचाही २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०५ वाजता तिबेट-नेपाळ सीमेवर असताना शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर पूरस्थितीमुळे संपर्क होऊ शकलेला नाही. तर नवी मुंबईतील यशस भांड हे तिमुरेच्या दिशेने रसुवा मार्गावर प्रवास करत होते. त्यांच्याशी सकाळी ७.१५ वाजता संपर्क झाल्यानंतर ८.१५ वाजता आलेला मिस्ड कॉल घेता आला नसल्याची नोंद आहे. पूरस्थितीमुळे प्रवासाच्या मार्गावर अडकलेले किंवा ज्यांच्याशी सध्या संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही, अशा नागरिकांची ही प्राथमिक नोंद आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबीयांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे.

नेपाळमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांची माहिती संकलित करून आवश्यक समन्वय आणि पुढील मदतकार्य करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील नेपाळमध्ये असलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी संबंधित व्यक्तीची अचूक माहिती प्रशासनाकडे उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून बचाव, संपर्क आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थलांतरासाठी पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्कासाठी महत्त्वाची माहिती

नेपाळमध्ये अडकलेल्या किंवा संपर्क होत नसलेल्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी तात्काळ संपर्क साधावा माहिती देताना : नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवास व टूर ऑपरेटरची माहिती, सोबतच्या व्यक्तींची संख्या, नातेवाईकांचा संपर्क क्रमांक आणि शेवटचा संपर्क कधी व कुठून झाला याची माहिती द्या

जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, ठाणे १०७७ (टोल फ्री) तसेच ९३७२३ ३८८२७, ०२२-२५३०१७४ यावर नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.