ठाणे : रायगड जिल्ह्यातील गर्दीच्या कर्जत आणि नेरळ स्थानकांच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. भिवंडीचे खासदार बाळ्या मामा यांनी या दोन स्थानकांची नावे स्वांतत्र्य सेनानींच्या नावाने करण्याची मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली. त्यामुळे या स्थानकांची नावे बदलणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.रायगड जिल्ह्यातील मध्य रेल्वेला जोडणारी कर्जत आणि नेरळ ही स्थानके महत्त्वाची आहे.
हा भाग निसर्गरम्य असल्याने मुंबई, ठाण्यातून हजारो पर्यटक या भागात जात असतात. तसेच नोकरदार आणि व्यवसायिक देखील मोठ्याप्रमाणात तेथून ठाणे, मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. या शहरांना जुना इतिहास आहे. माथेरान किंवा कर्जतच्या धबधब्यांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची या स्थानकांत गर्दी होत असते. आता या स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केली जात आहे.
काय आहे मागणी
रायगड जिल्ह्यातील नेरळ व कर्जत या दोन्ही रेल्वे स्थानकांना स्थानिक स्वतंत्र सेनानींची नावे द्यावी अशी मागणी देखील राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार बाळ्या म्हात्रे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. नेरळ रेल्वे स्थानकाला ”स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा वीर हिराजी गोमाजी पाटील नेरळ रेल्वे स्थानक” असे नामकरण करण्यात यावे.
तसेच कर्जत रेल्वे स्थानकाला ”स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा वीर भाई कोतवाल कर्जत रेल्वे स्थानक” असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी खासदार म्हात्रे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. नेरळ व कर्जत या दोन्ही रेल्वे स्थानकांना स्थानिक स्वातंत्र्यसेनानींची नावे दिल्यास त्यांच्या कार्याचा गुणगौरव होणार असून त्यामुळे स्थानिक युवक व नागरिकांना प्रेरणा मिळेल यासाठी आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे नामकरणाची मागणी केली आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.
