नवअंबरनाथकर प्रदूषणाच्या विळख्यात

वाढत्या शहरीकरणात सहभागी होणाऱ्या नवअंबरनाथकरांच्या घरांशेजारी प्रदूषणाचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे.

अंबरनाथ पूर्वेतील मोरीवली भागात असलेल्या कचराभूमीमुळे प्रदूषणात वाढ होत आहे.

कचराभूमी, औद्योगिक वसाहतीतील धूर आणि दरुगंधीमुळे नागरिक हैराण
श्वसनाचे विकार, साथीच्या आजारांच्या तक्रारी
अंबरनाथमधील वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील वस्त्या टोकावर असलेल्या क्षेपणभूमी व औद्योगिक वसाहतींच्या दारात येऊन पोहोचल्या आहेत. येथे किफायतशीर दरात घरे असल्याने स्थलांतर करणाऱ्या अनेकांनी येथील घरांची निवड केली आहे. मात्र आता प्रदूषणामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचराभूमी आणि औद्योगिक वसाहतीतून निघणारा धूर व दरुगधी यांच्या प्रदूषणामुळे येथील नागरिकांना श्वसनाचे विकार व साथीचे आजार होत असल्याच्या तक्रारी येथील नागरिक करू लागले आहेत. त्यामुळे वाढत्या शहरीकरणात सहभागी होणाऱ्या नवअंबरनाथकरांच्या घरांशेजारी आता प्रदूषणाचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे.
अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात गेल्या तीन ते चार वर्षांत मोठय़ा प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. शहरापासून काहीसे लांब असल्याने येथील घरांचे पर्याय नागरिकांच्या खिशाला दिलासा देणारे ठरत आहेत. मात्र अंबरनाथ नगरपालिकेची मोरिवली भागात असलेली कचरीभूमी तसेच मोरिवली येथील रासायनिक कारखाने आणि सगळ्यात मोठी आनंदनगर औद्योगिक वसाहत यांच्या दाराशी येथील गृहप्रकल्प येऊन पोहोचले आहेत.
अंबरनाथ पालिकेच्या कचराभूमीवर दररोज १०० टन कचरा हा पालिकेकडून टाकण्यात येतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा कचरा जाळण्यात येतो. या कचऱ्याचा सगळा धूर सायंकाळच्या वेळी आजूबाजूच्या एक किलोमीटरच्या परिघात पसरतो. नेमके याच पट्टय़ात नवे गृहप्रकल्प झाल्याने त्यांच्या इमारतींच्या आवारात सायंकाळी प्रसन्न वातावरणाऐवजी धुराचे लोट पसलेले असतात. तसेच आजूबाजूच्या औद्योगिक वसाहतींमधून निघणारा धूर व त्याची दरुगधीही या पट्टय़ात पोहोचलेली असते. त्यामुळे येथील नागरिकांना क्षेपणभूमी व औद्योगिक वसाहतींमधील धूर व दरुगधी याचा दुहेरी त्रास होत आहे.

कचराभूमीवरील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आम्ही करणार असून त्याला कार्यान्वित होण्यासाठी वर्षभराचा कालावधी जाणार आहे. कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यास त्यातून होणारे प्रदूषण नजीकच्या काळात कमी होऊ शकेल.
-गणेश देशमुख, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद

कचराभूमीवरील धूर व दरुगधी आमच्या सोसायटी परिसरात राहणाऱ्या सर्वच नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. याबाबत कचराभूमीचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एक हजार सह्य़ांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार केली आहे. मात्र या प्रश्नावर अद्याप कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाहीत.
-प्रशांत चौधरी, स्थानिक नागरिक
अशी आहे परिस्थिती
अंबरनाथ पूर्वेकडील मोरिवली भागात व काटई नाक्याकडे जाणाऱ्या महामार्गालगत नव्याने झालेले सात मोठे गृहप्रकल्प व दहा ते बारा छोटे गृहप्रकल्प.
या गृहप्रकल्पांमध्ये साठच्यावर इमारतींमध्ये दहा हजारांहून अधिक नागरिकांचे वास्तव्य.
काटई नाक्याकडे जाणाऱ्या महामार्गाकडे आनंदनगर औद्योगिक वसाहत तर या मार्गाकडे फॉरेस्ट नाका येथून येणाऱ्या रस्त्यालगत पालिकेची क्षेपणभूमी.
येथे राहणाऱ्या नागरिकांना दमा, फुफ्फुसाचे विकार, श्वसनाचे विकार तर खोकला व सर्दी, ताप हे आजार वारंवार सतावू लागले
आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New ambernath is under pollution

ताज्या बातम्या