ठाणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पक्ष प्रवेशांची मालिका सुरू झाली आहे. असे असतानाच, निवडणुकांच्या तोंडावर भाजपने ठाणे जिल्ह्यातील शहराध्यक्षांना हटवून त्यांच्या जागी नवीन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या नव्या सेनापतींच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणुका लढण्याची योजना भाजपने आखल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांच्या महायुतीचा ठाणे जिल्ह्यात वरचष्मा राहिला. तीनपैकी दोन लोकसभा मतदार संघ तर, १८ पैकी १६ विधानसभेच्या जागा महायुतीने जिंकल्या. यामुळे जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व वाढल्याचे चित्र आहे. यामध्ये भाजपचे ९ तर शिवसेनेचे ६ आमदार आहेत. या दोन्ही पक्षांची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. असे असले तरी, महापालिका निवडणुका तिन्ही पक्ष महायुतीत लढणार की स्वतंत्र लढणार याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत. त्यातच जिल्ह्यात इतर पक्षातील माजी नगरसेवकांना गळा लावत आपल्या पक्षात प्रवेश देण्याची मालिका सुरू झाली असून यामध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे) दोन्ही पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा भागातील राष्ट्रवादीच्या ११ माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला होता. त्याचबरोबर या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याच्या तयारीत असलेल्या भाजपलाही शह दिला होता. याशिवाय, नवी मुंबई पालिकेत भाजप नेते गणेश नाईक यांचे आजवर वर्चस्व राहिले आहे. मात्र, येथील इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचे काम उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सुरू असल्याचे चित्र आहे. एकूणच जिल्ह्यात शिवसेना (शिंदे) आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांमध्येच पालिकेतील सत्तेची लढाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असतानाच, निवडणुकांच्या तोंडावर भाजपने ठाणे जिल्ह्यातील शहराध्यक्षांना हटवून त्यांच्या जागी नवीन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्या जिल्हाध्यांची नियुक्ती

ठाणे जिल्ह्यातील शहराध्यक्षांना हटवून त्यांच्या जागी नवीन शहराध्यक्षांची भाजपने नियुक्ती केली असून तसे भाजपा प्रदेश निवडणुक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. या पत्रकानुसार, ठाणे शहराध्यक्ष पदावरून संजय वाघुले यांना हटवून त्यांच्या जागी संदिप लेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण अध्यक्ष पदावर जितेंद्र डाकी यांना कायम ठेवण्यात आले आहे. भिवंडी शहराध्यक्ष पदावरून ॲड. हर्षल पाटील यांना हटवून त्यांच्या जागी रविकांत सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिरा-भाईंदर शहराध्यक्ष पदावरून किशोर शर्मा यांना हटवून त्यांच्या जागी दिलीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई शहराध्यक्ष पदावरून रामचंद्र घरत यांना हटवून त्यांच्या जागी डाॅ. राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण शहराध्यक्ष पदावरून नरेंद्र सुर्यवंशी यांना हटवून त्यांच्या जागी नंदु परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उल्हासनगर शहराध्यक्ष पदावरून प्रदीप रामचंदानी यांना हटवून त्यांच्या जागी राजेश वधारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.