शाळेच्या बाकावरून : नवी आशा, नवी आकांक्षा!

लोकांसाठी चैनीची गोष्ट आहे. त्यामुळे सकस, पौष्टिक आहार या गोष्टी तर खूपच दूरच्या आहेत.

पोटभर जेवण आणि तेही रोज दोन्ही वेळेला ही इथल्या लोकांसाठी चैनीची गोष्ट आहे.

आपल्या मुलाला सर्व सुखे प्राप्त व्हावीत, त्याला कोणत्याही प्रकारची झळ लागू नये म्हणून पालक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. मुलाला उत्तम शाळा, उत्तम शिक्षण, पौष्टिक आहार, उत्तम कपडे, खरं तर प्रत्येक गोष्ट बेस्ट मिळेल याबाबत त्यांचा कटाक्ष असतो. अक्षरश: तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाला जपताना सर्व सुखसोयींनी युक्त असे जगणे त्याला प्राप्त व्हावे म्हणून जिवाची धडपड करतात. पण आपण ठाण्याहून जेव्हा बदलापूरला जातो आणि तेथील (कात्रप रोड) मोहाचा पाडा परिसराला भेट देतो तेव्हा आपण नाण्याची दुसरी बाजू, खरं तर जगण्याचे वास्तव अनुभवतो. पोटभर जेवण आणि तेही रोज दोन्ही वेळेला ही इथल्या लोकांसाठी चैनीची गोष्ट आहे. त्यामुळे सकस, पौष्टिक आहार या गोष्टी तर खूपच दूरच्या आहेत. आणि म्हणूनच इथल्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न तसा गंभीरच म्हणावा लागेल.
या भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांना पिण्याजोगे स्वच्छ (आरोग्याला हानीकारक न ठरणारे) पाणी या समस्येला सातत्याने सामोरे जावे लागते. हा पाडा दोन भागांत ढोबळपणे विभागला गेला आहे. पाडय़ाचा एक भाग काहीसा उंचावर आहे आणि दोन्ही भागांत मिळून ६० ते ६५ घरे आहेत. पावसाळ्यात हा काहीसा डोंगरी भाग असल्याने वरून वाहत येणारे पाणी मिसळले गेल्यावर उपलब्ध पाणी अत्यंत गढूळ होते. त्यामुळे येथील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. उन्हाळ्यात तर पाण्याची प्रचंड टंचाई आणि मैल-दोन मैल चालल्यावर पिण्याचे पाणी थोडेफार आणता येते. पाण्याच्या संदर्भात ठाण्यातील भारतीय महिला फेडरेशनच्या महिला कार्यकर्त्यांना मुलांच्या आरोग्याची समस्या आणि त्याचे गांभीर्य लक्षात आले. मग संस्थेने एक प्रश्नावली तयार केली आणि पाहणी करण्याचे ठरवले. एकूण घरे किती, कुटुंबातील सदस्य संख्या, रेशन मिळतं का? जेवण काय घेतात? कोणते आजार होतात, इ. प्रश्न प्रश्नावलीत होते.
ही पाहणी करीत असताना घरोघरी असणारी छोटी मुले पाहताना पुरेसे अन्न मुलांना मिळत नाही हे सहज लक्षात येत होते. खरं तर संपूर्ण कुटुंबाचीच ती ज्वलंत समस्या आहे. उघडीवाघडी उन्हातान्हात वणवण फिरणारी मुले आणि आपल्या शहरी भागातली मुले यांच्यातील फरक सर्वाना जाणवत होता. कुपोषणामुळे लहान मुलांचे डोळे चिकटणे, डोळे आल्यासारखे डोळे सतत लाल होणे, डोळ्यातून घाण येणे, इ. समस्या तेथे मोठय़ा प्रमाणावर दिसून येतात. पिण्यासाठी योग्य पाणी मिळत नसल्याने पोटाचे आजार- पोट बिघडणे, जुलाब होणे, जंत होणे हेही तेथे मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. जवळ डॉक्टर नसल्याने भोंदूगिरीला सहज बळी पडत असत. २ ते २।। मैल वैद्यकीय मदतीसाठी चालत जावे लागते. त्यामुळे येथे बाळंतपणही घरातच होते. एकंदर परिस्थिती पाहणी केल्यावर लक्षात आली आणि आरोग्यविषयक जनजागृती करण्याची निकड जाणवली. जनजागृतीच्या माध्यमातून गावकऱ्यांपर्यंत पोहोचायचे, स्वच्छतेचे आरोग्याचे महत्त्व टप्प्याटप्प्याने समजावून द्यायचे, त्यांच्या मुलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर काम करायचे असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला. भारतीय महिला फेडरेशन आणि मालती वैद्य स्मृती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा आराखडा प्रत्यक्षात राबवण्यास प्रारंभ झाला. गेल्या वर्षी २६ जाने. रोजी सावरोली पाडा येथे लहान मुलांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले होते. मोहाच्या पाडय़ावरील कामासदेखील आरोग्य शिबिराच्या माध्यमातूनच प्रारंभ करण्यात आला. खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, पाणी उकळून पिणे, शौचास जाऊन आल्यावर हात धुणे, हात धुतल्याशिवाय लहान बाळांना भरवू नये, इ. मुद्दय़ांवर जोर देण्यात आला.
गेल्या वर्षीपासून दर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात संस्थेच्या महिला कार्यकर्त्यां या आदिवासी पाडय़ावर जाऊन येथील लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करतात, तेथील मुलांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतात. डॉ. नलिनी धनक या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी केली जाते. औषधे दिली जातात, ती कशी घ्यायची ते प्रत्येकाला समजावून दिले जाते. या मुलांसाठी आणून दिलेल्या कपडय़ांची छाननी करून घालण्यायोग्य कपडे या फेरीच्या वेळी नेले जातात. साधारणपणे थंडी वाजून ताप येणे, सर्दी-खोकला, जुलाब होणे, रक्ताची कमतरता या इथल्या मुले आणि मोठी माणसे यांच्या समस्या सातत्याने दिसून येतात. साधारणपणे डाळ-भात आणि कोरा चहा (कारण दूध परवडत नाही) असा आहार असल्याने कुपोषणाच्या समस्या आहेत. भूक न लागणे, रक्ताची कमतरता, व्हिटॅमिन्स/ मिनरल्स यांची कमतरता यासाठी आवश्यक ती औषधे इथे दर महिन्याला (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार) मोफत दिली जातात. कपडय़ांचे वाटप केले जाते. प्रत्येक रुग्णाचे नाव, आजार, औषध यांची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. बदलापूर स्टेशनपासून हा पाडा रिक्षाने जाण्यास एका तासाच्या अंतरावर आहे. पावसाळ्यात तर रस्ता अतिशय खराब होतो आणि प्रवास करणे काहीसे अवघड जाते. पण तरीही या कार्यकर्त्यां तेथे जातात. पाडय़ावरील एका घराच्या अंगणात ही रिक्षा थांबते. मग पाडय़ावरले आदिवासी मुलाबाळांना घेऊन येतात, त्यांची मग ओसरीवर तपासणी केली जाते, आजार समजून घेतला जातो आणि मग औषधे दिली जातात. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गावकऱ्यांचा विश्वास अल्पावधीतच प्राप्त करता आला, त्यामुळे आदिवासी बांधव गावठी उपचारांची मदत न घेता वैद्यकीय साहाय्य घेण्यास प्राधान्य देऊ लागले. आपल्या मुलांचे आजार औषध घेतल्यावर, डॉक्टरांची मदत घेतल्यावर बरे होतात असा विश्वास वाटू लागल्याने ते मोकळेपणाने समस्यांविषयी बोलू लागले. डॉक्टर, औषधे घेऊन येणारी रिक्षा दिसू लागल्यावर हे बांधव स्वत:हून मुलांना घेऊन येऊ लागले. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्याजोगी की, मुलगा की मुलगी हे जाणून घेण्यासाठी ते कोणतीही तपासणी करून घेत नसल्याने इथे मुलींची संख्या चांगली दिसून येते.
वैद्यकीय मदतीची निकड लक्षात घेऊन मालती वैद्य यांच्या वास्तूमध्ये आदिवासी बांधवांसाठी आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. बदलापूर स्टेशनपासून (पूर्वेला) २० ते २५ मि. अंतरावर हे केंद्र आहे. इथल्या मुलांसाठी आरोग्यविषयक प्रश्नावर काम करणे ही इथल्या पालकांची निकड आहे. रोहित उघडा या मुलाचे उदाहरण आपल्याला अंतर्मुख करून टाकते. हा पाच वर्षांचा मुलगा केवळ वर्ष-दीड वर्षांच्या मुलाएवढा दिसतो. त्याला अनेक समस्या आहेत. ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही आणि चालूही शकत नाही. सध्या ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात समाजातील सुहृदांच्या आर्थिक सहकार्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी, सुरू झाल्यावर शुभेच्छांची देवाणघेवाण होते. येणारं नवीन वर्ष सुखासमाधानाचं, भरभराटीचं जाऊ दे असं वाचताना, ऐकताना, दुसऱ्याला पाठवताना आपल्याला बरं वाटतं. आपणही मनोमन आपल्या कुटुंबासाठी, आप्तस्वकीयांसाठी मित्रमैत्रिणींसाठी प्रार्थना करतो. मला वाटतं आपण सर्व जण या आदिवासी बांधवांच्या आयुष्यावरील समस्यांचे, अडीअडचणींचा काळोख दूर होईल, एखादा तरी आशेचा किरण येईल आणि त्यांचे जगणे काही प्रमाणात तरी सुकर होईल अशी मनापासून प्रार्थना करू यात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New hope new aspirations