ठाणे : ठाण्यातील आनंदनगर येथील ”न्यू होरायझन स्कॉलर स्कूल” या शाळेने १० वी उत्तीर्ण विद्यार्थिनीचा शाळा सोडल्याचा दाखला १२ हजार ६९० विलंब शुल्क न भरल्याच्या कारणावरून देण्यास नकार दिला होता. या प्रकरणाची दखल ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने घेतली असून प्राचार्यांना नुकतीच नोटीस पाठविण्यात आली आहे.
विद्यार्थीनी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी मध्ये शिकत होती. १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी तिला शाळा सोडल्याच्या दाखल्याची अत्यंत आवश्यकता होती. त्यासाठी तिने व तिच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे दाखला मिळण्याची वारंवार विनंती केली होती. मात्र, शाळेने १२ हजार ६९० ही ”विलंब शुल्क दंडाची रक्कम” भरलेली नाही, हे कारण पुढे करत विद्यार्थिनीला दाखला देण्यास स्पष्ट नकार दिला. ऐन प्रवेश प्रक्रियेच्या वेळी दाखला मिळत नसल्याने विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. यानंतर मुलीच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्याकडे तक्रार दिली. त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली व शाळेच्या या बेकायदेशीर कृतीवर कारवाईची मागणी केली.
अखेर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी न्यू होरायझन स्कॉलर स्कूलच्या प्राचार्यांना एक पत्र पाठवले आहे. शासन आणि न्यायालयाच्या निर्देशांनुसार शाळेने तात्काळ कारवाई करावी व विद्यार्थिनीला तिचा शाळा सोडल्याचा दाखला सुपूर्द करावा. जर शाळेच्या या अडवणुकीमुळे या विद्यार्थिनी पुढील शिक्षणापासून वंचित राहिली, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी न्यू होरायझन स्कूलच्या व्यवस्थापनाची राहील, असेही पत्रात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
