ठाणे : ठाणे शहरात झपाट्याने वाढत असलेल्या लोकवस्तीसह मुलांना खेळण्यसाठी क्रीडांगण देखील असणे गरजेचे झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे पूर्वेत सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले करण्यात आले आहे. नुकतेच या क्रीडांगणाचे आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन पार पडले.

लोकप्रिय होत असलेल्या पिकल बॉल या खेळाला चालना देण्यासाठी ठाणे पूर्व भागात नविन पिकल बॉल कोर्ट उभारण्यात आला आहे. पीपल एज्युकेशन सोसायटी आणि द्रोणाचार्य क्रीडा अकादमी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ठाण्यात यापूर्वी काही खाजगी पिकल बॉल कोर्ट उपलब्ध असले, तरी सर्वसामान्य खेळाडूंना सहज उपलब्ध होईल असे हे पहिलेच महत्त्वाचे कोर्ट मानले जात आहे.

ठाणे पिकल बॉल असोसिएशनच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या उपक्रमामुळे खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. या उद्घाटन प्रसंगी पीपल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, सचिव आल्हाद जोशी, ठाणे पिकल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर डुंबरे, सचिव सचिन मोरे, अॅड. सुभाष काळे, संस्थेचे संचालक भोळे, तुरुकमाने तसेच मेधा भंडारी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आधुनिक खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी व्यासपीठ या नव्या कोर्टमुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पिकल बॉलसारख्या आधुनिक खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. भविष्यात अधिकाधिक युवा या खेळाकडे वळतील आणि व्यावसायिक स्तरावर संधी निर्माण होतील. आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. या नव्या क्रीडा सुविधेमुळे ठाणे पूर्व भागातील क्रीडा संस्कृतीला नवी उभारी मिळणार असल्याचे चित्र आहे.