नियमभंग केल्यास आस्थापनाला टाळे; विवाह समारंभासाठी ५०, तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींनाच परवानगी
ठाणे : करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने नव्याने लागू केलेल्या नियमावलीच्या आधारे ठाणे महापालिका प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत शहरात नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सिनेमागृह, हॉटेल, उपाहारगृह, आरोग्य सेवा वगळता अन्य सर्व कार्यालये, दुकाने अशा आस्थापना पूर्वीप्रमाणे म्हणजेच ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. विवाह समारंभासाठी ५०, तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. विशेष म्हणजे, नव्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले तर, संबंधित आस्थापनांना करोना महासाथ संपेपर्यंत टाळे लावण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील विविध शहरांमध्येही अशीच काहीशी परिस्थिती आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याआधारे ठाणे महापालिका प्रशासनाने शहरात नवे निर्बंध लागू केले असून याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नव्या निर्बंधांची माहिती दिली. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आस्थापना रात्री ९.३० वाजेपर्यंत तर, हॉटेल रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी यापूर्वीच परवानगी दिली होती.
नव्या नियमावलीमध्ये आस्थापना आणि हॉटेलच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नसून ते पूर्वीच्या नियमाप्रमाणेच सुरू राहणार आहेत. तसेच शहरातील सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट, अन्य सर्व कार्यालये आणि आस्थापना ५० टक्के क्षमतेनेच सुरू आहेत. हाच नियम नव्या नियमावलीत कायम ठेवण्यात आला आहे. लग्न समारंभासाठी ५०, तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना परवानगी असणार आहे, अशी माहिती आयुक्त शर्मा यांनी दिली. टीएमटीच्या बसगाडय़ांमध्ये ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या शेअर रिक्षांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका निर्बंध लावत आहे. त्यामुळे या नियमांचे पालन करण्याची नागरिकांचीही जबाबदारी असून त्यांनी पालिकेला सहकार्य करायला हवे, असे आवाहन महापौर म्हस्के यांनी केले.
धार्मिक स्थळांसाठी नियम
अंतरसोवळ्याच्या नियमाचे पालन व्हावे यासाठी धार्मिक स्थळांच्या क्षमतेनुसार एका तासामधील भाविकांची संख्या निश्चित करून त्याबाबतची प्रसिद्धी धार्मिक व्यवस्थापनाकडून करण्यात यावी. भाविकांसाठी ऑनलाइन आरक्षणाच्या सुविधेस प्रोत्साहन देण्यात यावे, असा नियम धार्मिक स्थळांसाठी लागू केला आहे.
मुखपट्टीविना प्रवेश नाही
ठाणे शहरातील सर्व सिनेमागृहे, हॉटेल, उपाहारगृहे, शॉपिंग मॉल, सर्व कार्यालये, आस्थापनांमध्ये मुखपट्टीशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये. प्रवेशावेळी प्रत्येकाचे तापमान तपासूनच प्रवेश द्यावा. त्यात ताप किंवा तापाची लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश देऊ नये. प्रत्येक प्रवेशद्वारावर सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे. मुखपट्टी वापर आणि अंतरसोवळ्याच्या नियम याची दक्षता घेण्यासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग आस्थापनाने उपलब्ध करावा, अशा सूचना नव्या नियमावलीत प्रशासनाने केल्या आहेत.
गृह विलगीकरणाचे नियम
स्थानिक प्रशासनास आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली गृह विलगीकरण करण्यात येणार आहे. १४ दिवसांसाठी गृह विलगीकरण असल्याबाबतचे माहिती फलक संबंधित घरावर लावण्यात येणार आहेत. करोनाबाधित रुग्णांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले तर गृह विलगीकरण करण्यात व्यक्तीला तात्काळ करोना उपचार केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. मास्कचा वापर करण्यात यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नवे नियम काय आहेत?
’ ठाणे शहरातील सर्व सिनेमागृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व कार्यालये, आस्थापना ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
’ कोणत्याही समाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी
’ लग्न समारंभासाठी केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी असेल.
’ अंत्यविधीसाठी केवळ २० व्यक्तींनाच परवानगी असेल.
ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिक जमणे, विविध सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय पक्षांचे कार्यक्रम, उपोषण, सभा आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी ठाणे पोलिसांनी मनाई आदेश काढला असून तो ३० मार्चपर्यंत लागू असणार आहे.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यातच येत्या काही दिवसांवर होळी आणि धूलिवंदन हे उत्सव आले आहेत. त्यानिमित्ताने ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील म्हणजेच ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच शहरात विविध राजकीय पक्षांकडून आंदोलने करण्याबरोबरच मोर्चे काढण्यात येतात. यामुळे शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात मनाई आदेश लागू केले आहेत. त्यामुळे आंदोलने आणि सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे. त्याचबरोबर पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढण्यासही बंदी असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणे पोलिसांनी स्पष्ट केले. अंत्यसंस्कार, मिरवणुका, सरकारी, निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले नागरिक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका यासाठी हे आदेश लागू राहणार नाहीत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
