कान्होर गावातील महिला बचतगटाची तंत्रज्ञानाने भातशेती; वेळेची आणि पैशाची देखील बचत

वाढत्या नागरीकरणाच्या रेटय़ात शहराजवळील गावांतील शेतकरी शेतजमिनी विकून शहरीकरणात सहभागी होण्यास आतुर असतात. मात्र बदलापूरजवळील कान्होर गावातील महिला बचतगटाने आधुनिक तंत्रज्ञानाचा भातशेतीत वापर करायला सुरुवात केली आहे. भात पीक लागवडीसाठी आदर्श मानल्या गेलेल्या ‘पॅडी ट्रान्स्प्लांटर’चा ठाणे जिल्ह्य़ात गेल्या वर्षांपासून वापर होऊ लागला आहे. अपुरे मनुष्यबळ आणि पारंपरिक पद्धतीमुळे तोटय़ात आणि बेभरवशाच्या होत चाललेल्या भातशेतीला त्यामुळे नवसंजीवनी मिळू शकेल.

‘पॅडी ट्रान्स्प्लांटर’ यंत्राच्या साहाय्याने भात लावणीचे काम अत्यंत अल्प कालावधीत पार पडते. पारंपरिक पद्धतीने याच कामाला किमान दीड महिना एवढा वेळ लागतो. तसेच कमी दर्जाचे काम म्हणून भात लावणीच्या या कामाला शेत मजूर मिळणे अत्यंत दुरापास्त असते. एकेक रोप वाकून लावावे लागत असल्याने दीर्घ काळ हे काम केल्यास पाठदुखीचा त्रास होतो. त्यातूनही जे मजूर मिळतात, त्यांना पुरेसे प्रशिक्षण आणि अनुभव नसतो. परिणामी अयोग्य पद्धतीने रोपांची लागवड केल्यामुळे भात पिकाच्या उत्पादनात घट होते. तसेच जमाखर्चाचाही मेळ जमत नसल्याने हल्ली ठाणे जिल्ह्य़ातील बरेच शेतकरी भात पीक घेणे टाळू लागले आहेत. त्यामुळे एकेकाळी ‘भाताचे कोठार’ ही ठाण्याची असलेली ओळख मागे पडली आहे. ‘वाडा कोलम’ ही भाताची जात आता केवळ नावापुरतीच उरली आहे. हा दर वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन शासकीय पातळीवर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांमार्फत अंबरनाथ तालुक्यात भातलावणी यंत्रांचे वाटप केले .

या यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी १४ दिवसांची रोपे लागत असल्याचे कृषी अधिकारी आर. एच. पाटील यांनी सांगितले. बदलापुरातील प्रगती महिला ग्रामसंघ महिला बचत गटाला हे यंत्र देण्यात आले, असून यंदा पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यातील काही शेती लागवडीचा जबाबदारी घेतल्याची माहिती महिला बचत गटाच्या अध्यक्षा विशाखा राऊत यांनी दिली. या यंत्राच्या पहिल्या प्रयोगाप्रसंगी स्थानिक आमदार किसन कथोरे, कृषी अधिकारी आणि महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

भातलागवडीसाठी ‘पॅडी ट्रान्स्प्लांटर’

‘पॅडी ट्रान्स्प्लांटर’ हे यंत्र शेतात एकसारखी (प्रमाणित) रोपलागवड करते. त्यामुळे दोन रोपांमध्ये योग्य अंतर राखले जाऊन उत्पादनात वाढ होते. पारंपरिक पद्धतीने एक हेक्टर क्षेत्रात भातलागवड करायची असेल तर दहा मजुरांना दोन दिवस लागत0ात. यंत्राद्वारे हेच काम तीन तासांत होते. त्यामुळे मजुरांच्या समस्येवर हा चांगला उपाय आहे. ‘पॅडी ट्रान्स्प्लांट’रला एका तासासाठी तीन लिटर इंधन लागते. त्यामुळे खर्चाच्या दृष्टीनेही व्यवहार्य आहे.