scorecardresearch

बदलापुरात लवकरच नवे जलशुद्धीकरण केंद्र

पाण्याची प्रत्यक्ष मागणी आणि त्या तुलनेत होणारा पाणीपुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी १५ दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीतकरण केंद्राची उभारणी केली जाणार आहे.

बदलापुरात लवकरच नवे जलशुद्धीकरण केंद्र
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

१५ दशलक्ष लीटर पाणी उचल करता येणार, निविदा जाहीर

बदलापूरः पाण्याची प्रत्यक्ष मागणी आणि त्या तुलनेत होणारा पाणीपुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी १५ दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीतकरण केंद्राची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नुकतीच निविदा जाहीर करण्यात आली असून येत्या तीन ते चार महिन्यात हे काम पूर्ण होण्याची आशा आहे. त्यामुळे नव्याने १५ दशलक्ष लीटर पाणी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहराची लोकसंख्या गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे शहराची पाण्याची तहानही वाढली आहे. पाण्याची मागणी वाढलेली असताना त्या तुलनेत पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरात अनेकदा पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चे नेले जातात. त्याचवेळी उल्हास नदी आणि जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्प आणि चिखलोली धरणाच्या माध्यमातून दोन्ही शहरातील पाण्याची गरज भागवण्यासाठी जलस्त्रोत आहेत. मात्र त्याचे वितरण करण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने शहरात पाणी टंचाईचे चित्र असते. त्यामुळे अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जीवन प्राधिकरणातर्फे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून अतिरिक्त २० दशलक्ष लीटर पाण्याची मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा >>> घनकचरा व्यवस्थापनाऐवजी थेट कचऱ्याला ‘अग्नी’; अंबरनाथमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमांची ऐशीतैशी

मात्र ती मागणी नाकारण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्वनिधीतील खर्चातून स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांनी परवानगी दिली होती. त्यानुसार १५ दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी निविदा नुकतीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून काढण्यात आली. डिसेंबर अखेरपर्यंत या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश दिले जाणार असून त्यानंतर तीन ते चार महिन्यातच या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> उत्तरप्रदेशातील सराफा व्यापाराची ११ लाख रुपयांची फसवणूक

अतिरिक्त १५ दशलक्ष लीटर पाणी मिळणार

पाण्याची मागणी पाहता या नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीनंतर अतिरिक्त १५ दशलक्ष लीटर पाण्याची उपलब्धता होणार आहे. हे पाणी अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पुरवले जाईल. त्याचा दोन्ही शहरातील कमी पाणी पुरवठा होत असलेल्या भागांना फायदा होणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 17:02 IST

संबंधित बातम्या