पाटबंधारे विभागाच्या पालिकांना सूचना

उल्हास नदीतील पाणी साठा कमी झाल्याने पाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्य़ातील विविध महापालिका तसेच नगरपालिकांना अतिदक्षतेचा इशारा देताना नव्या इमारतींचे बांधकाम तसेच वसाहतींमधील तरणतलावांना शक्यतो पाणी देऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. उल्हास नदी खोऱ्यातील पाणी अडवून उभारण्यात आलेले बारवी आणि आंध्र धरणातील पाणी साठा कमी झाल्याने ४० टक्क्य़ांपर्यंत पाणी कपातीचे संकेत पाटबंधारे विभागाने दिले होते.
या कपातीचा मोठा फटका ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह जिल्ह्य़ातील प्रमुख महापालिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून खासगी बागांना करण्यात येणारा पाणीपुरवठाही बंद केला जावा, असेही सुचविण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्य़ात विशेषत उल्हास नदी खोऱ्यातून ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना पाण्याचा पुरवठा केला जातो. उल्हास नदीतील पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडे असून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमध्ये १५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने येत्या १ ऑक्टोबरपासून पुढील २८८ दिवसांसाठी पाणीपुरवठय़ाचा नियोजन आराखडा पाटबंधारे विभागाने आखला आहे.

पाटबंधारे विभागाने सुचविलेले उपाय
’येत्या काळात नव्या बांधकामांना तसेच तरण तलावांना पाणीपुरवठा करू नये.
’पाण्याच्या सुयोग्य नियोजनासाठी तातडीने बैठक घेण्यात यावी, तसेच पाणी गळती कमी करण्यासाठी उपाय योजावेत.
’पेयजल तसेच मोठय़ा प्रमाणातील पाणी वापर करणाऱ्या व्यावसायिकांना तंबी द्यावी अथवा प्रतिबंध करावा.
’खासगी वसाहती, क्लब तसेच महापालिकेच्या तरण तलावातील पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश तातडीने दिले जावेत.
’तसेच खासगी बगिच्यांना पाणीपुरवठा बंद केला जावा.