कल्याण – कल्याण पश्चिमेतील कल्याण कृषी बाजार समितीच्या आवारातील धान्य गोदामात रविवारी नवी दिल्ली येथील नॅशनल इन्सटिट्युट ऑफ फॅशन टेक्नाॅलाॅजी प्रवेश पूर्व परीक्षेचे केंद्र होते. या परीक्षा केंद्रातील गैरसोयी, परिसरातील दुर्गंधी, अस्वच्छता आणि अडगळीच्या जागेत हे केंद्र असल्याने विद्यार्थी, पालकांनी हे केंद्र निश्चित करणाऱ्या यंत्रणेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली.

वसई, विरार, डहाणू, गोरेगाव, मीरा भाईंदर, बोरिवली, मालाड परिसरातून विद्यार्थी, पालक या परीक्षा केंद्रावर पहाटे तीन ते चार वाजल्यापासून आले आहेत. मुंबईपासून दूर अंतरावर आणि अडगळीच्या जागेतील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील धान्य गोदामाचा भव्य सभागृह नियोजकांनी परीक्षा केंद्र म्हणून निश्चित केले आहे. या परीक्षेसाठी ‘एनआयएफटी’ने प्रत्येक विद्यार्थ्याकडून दोन हजार परीक्षा शुल्क आकारले आहे. मग अडगळीच्या जागेतील परीक्षा केंद्र निवडण्यामागे परीक्षा आयोजकांचा नक्की उद्देश काय आहे, असे प्रश्न संतप्त पालकांनी केले.

परीक्षेचा तणाव विद्यार्थी, पालकांवर असतो. प्रत्येक पालक आपला मुलगा परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेच्या अगोदर पोहचावा म्हणून प्रयत्नशील होता. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत ही परीक्षा आहे. या परीक्षा केंद्रात आणि बाहेर विद्यार्थी, पालकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अशा कोणत्याही सुस्थितीमधील सुविधा नाहीत. महिला, पुरूषांसाठी एकच स्वच्छता गृह परीक्षा केंद्र भागात आहे. तेथे पाणी नाही. पाण्याचा एक पिंप बाहेर भरून ठेवण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. परीक्षा केंद्र परीसरात कत्तलखाना आहे. त्यामुळे पहाटेपासून दुर्गंधीने विद्यार्थी, पालक हैराण आहेत. काही विद्यार्थ्यांनी उग्र दुर्गंधीमुळे वांती केल्याची चर्चा आहे.

शाळा का वगळल्या

रविवार असल्यामुळे मुंबई परिसरातील शाळा, महाविद्यालये बंद असतात. या शिक्षण संस्थांमध्ये, कंपन्यांची संंगणकीकृत वातानुकूलित मोठ्या आकाराची सभागृहे असतात. ही सभागृह आयोजकांंनी भाड्याने घेऊन मुंबईतच या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची सोय का केली नाही, असे प्रश्न विद्यार्थी, पालक करत आहेत.

पालक उन्हात

परीक्षा सुरू झाल्यानंतर पालकांना बसण्यासाठी बाहेर कोठे स्वच्छ जागा नाही. त्यामुळे बाजार समितीमधील बंद गाळ्यांच्या बाहेर पालकांनी जमिनीवर बैठक मारल्याचे चित्र आहे. काही पालकांनी आपल्या लहान मुलांना सोबत आणले आहे. ही मुले दुर्गंधीने त्रस्त आहेत. दुर्गंधीमुळे याठिकाणी घरून आणलेला नाष्टा खाण्याची हिम्मत होत नाही, असे काही पालकांनी सांगितले.

विद्यार्थी मेहनत घेऊन आपल्या क्षमतेने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. पालक आपला मुलगा, मुलगी शिक्षणातून पुढे जावी म्हणून कर्ज घेतात. मुलांना शिकवतात. त्यात घाणेरड्या, अस्वच्छ परीक्षा केंद्रापासून विद्यार्थ्यांना आपल्या पुढील शिक्षणाची वाटचाल करण्याचा शुभारंंभ करावा लागत असेल तर शासनाला या मुलांनी पुढे जावे की घाणीतच अडकून पडावे असे वाटते ते एकदा जाहीर करावे, अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिल्या.

बाजार समितीमधील धान्य गोदाम सभागृह निश्चित करणाऱ्या संबंधितावर कठोर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.