ठाणे – वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष हा आता दिवसेंदिवस वाढत जात असतानाचा, शिवसेनेचे ( शिंदे ) आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनात भाषण करताना गणेश नाईक यांच्या वनखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एकीकडे राज्यात कोट्यवधी झाडे लावण्याचे नियोजन असताना कोकणात मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ही तोड नेमकी कोणासाठी होत आहे, कशासाठी होत आहे, असे सवाल उपस्थित करत ”वनखात्याचा टांगा पलटी झाला आहे’,’ असा टोला यावेळी निलेश राणे यांनी नाईक यांना लगावला आहे. यामुळे आता शिंदे विरुद्ध नाईक वाद अधिवेशनात देखील चर्चेचा विषय होत आहे.
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. यामध्ये गणेश नाईक यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर वारंवार कडाडून टीका केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे हरामचा पैसा, वरिष्ठांनी परवानगी दिली तर त्यांचा टांगा पलटी करून टाकू, ठाणे जिल्ह्यातून त्यांचे अस्तित्व मिटवून टाकू, एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या मुलाला कायमचे माजी करून टाकू अशी वक्तव्ये सातत्याने गणेश नाईक यांच्याकडून केली जात आहेत. याला एकनाथ शिंदे यांच्या प्रवक्तांकडून तसेच आमदार खासदारांकडून सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. आता शिंदे विरुद्ध नाईक हा वाद थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाऊन पोहोचला आहे. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी राज्यपालावरील अभिभाषणावर भाषण करताना गणेश नाईक यांना आणि त्यांच्या वनखात्याला लक्ष करत राज्यभरात वनखात्यात अत्यंत भोंगळ कारभार सुरू असल्याची टीका केली आहे.
निलेश राणे नेमकं काय म्हणाले ?
माझ्या मतदारसंघातील सिंधुदुर्ग तालुक्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. राज्यात कोट्यावधी वृक्ष लागवडीची घोषणा करण्यात येत आहे. एकीकडे आपण वृक्ष लागवडीची घोषणा करतो आणि दुसरीकडे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कोकण प्रांतातच मोठ्या प्रमाणात लाकूडतोड करत आहोत. ही लाकूडतोड नेमकी कशासाठी केली जात आहे, असा सवाल यावेळी निलेश राणे यांनी उपस्थित केला.
कोकणात जंगलच्या – जंगल नष्ट केली जात आहेत. यामुळे या जंगलातील जनावरे मानवी वस्तीत शिरत आहेत. यामुळेच मानव विरुद्ध वन्यप्राणी असा संघर्ष दिसून येत आहे. कोकणातील शेतकरी आज दिवसाढवळ्या देखील शेती करायला घाबरत आहेत. तरी या सगळ्या गोष्टींची तक्रारी त्याने करून देखील वन खात्यातून कोणीही प्रतिसाद देत नाही. यामुळे असे वाटते की वनखात्याचा टांगा पलटी झाला आहे. ज्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे त्यावर वनखात्याचे कोणतेही नियंत्रण नाही. असे ही निलेश राणे यांनी यावेळी भाष्य केले. तर प्रामुख्याने तळकोकणात मोठ्या प्रमाणात अमराठी वन अधिकाऱ्यांची भरती करून ठेवली आहे. त्यांना आमच्या मालवणी भाषेत आम्ही काय तक्रार करणार असे ही निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

