ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कल्याण – शिळफाटा मार्गावरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पुलाच्या शिळफाट्याकडे जाणाऱ्या मार्गावरील सुरक्षा भिंत (पॅरापेट) काही अंशी खचल्याचे झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील एक लेन वाहतुकीसाठी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली असून वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कल्याण, डोंबिवली, शिळफाटा, ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा दळणवळण मार्ग असल्याने या पुलावरून दररोज हजारो हलकी व अवजड वाहने प्रवास करतात. अशा परिस्थितीत पावसाळ्यात पुलाच्या सुरक्षा भिंत काही अंशी खचणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. शनिवारी सकाळी पुलाच्या एका बाजूची सुरक्षा भिंत पूर्वीच्या सरळ अलाइनमेंटमधून काही अंशी सरकल्याचे काही वाहनचालकांच्या निदर्शनास आले. याची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तातडीने बॅरिकेड्स उभारून शिळफाट्याकडे जाणारी एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. सध्या वाहतूक दुसऱ्या लेनवरून सुरू असून त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून विविध भागांतील रस्ते, पूल आणि अन्य पायाभूत सुविधांवर त्याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर निळजे उड्डाणपुलाचाही तज्ज्ञांकडून सखोल तांत्रिक तपास करण्यात यावा, पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याच्या संरचनेची स्थिरता तपासावी, तसेच आवश्यक त्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांच्या मते, केवळ सुरक्षा भिंत दुरुस्त करून हा विषय संपवू नये. पुलाच्या संपूर्ण संरचनेची तपासणी करून हालचालीमागील नेमके कारण शोधणे आवश्यक आहे. भविष्यात कोणताही अपघात किंवा दुर्घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित यंत्रणेकडून पुलाची तांत्रिक पाहणी सुरू आहे. तपासणी अहवालानुसार आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे समजते. मात्र, पावसाचा जोर कायम असताना पुलाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
