आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळांतील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

दहावीच्या निकालानंतर अनेक महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरू असतानाच वसई तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना नववीमध्ये प्रवेश मिळेनासा झाला आहे. केवळ आठवीपर्यंत असलेल्या या शाळांमधील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. वसईतील कामण येथील जिल्हा परिषद शाळेतून आठवी उत्तीर्ण झालेल्या ९० विद्यार्थ्यांना या वर्षी नववीत प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

वसई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २११ शाळा आहेत. या शाळा शहरी आणि ग्रामीण भागात आहेत. यातील काही शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहेत, तर काही शाळा पहिली ते आठवीपर्यंत आहेत. आठवी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गावातील किंवा जवळच्या एखाद्या अनुदानित खासगी संस्थांच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. नववीत प्रवेश घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. अनेक विद्यार्थ्यांना नववीत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते किंवा शाळेत न जाता बाहेरून दहावीचा अर्ज भरून परीक्षा द्यावी लागते. यंदाही हीच परिस्थिती उद्भवली आहे.

वसई पूर्वेच्या कामण येथील जिल्हा परिषद शाळांमधून आठवी उत्तीर्ण झालेल्या ९० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. एकूण सव्वाशे विद्यार्थी आठवी उत्तीर्ण झाले होती. त्यापैकी काही मुलांना प्रवेश मिळाला, पण ९० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहे.

नववीत इतर विद्यार्थी शाळेत जात असताता या मुलांना हताशपणे घरी बसण्याची वेळ आली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नववीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शाळेत प्रवेश न मिळाल्याने एक तर या विद्यार्थ्यांना खाजगीरीत्या दहावीची परीक्षा द्यावी लागेल. त्यात त्यांच्या अभ्यासावर आणि गुणवत्तेवर परिणाम होईल किंवा शिक्षणच अर्धवट सोडावे लागेल. हे सर्व विद्यार्थी आदिवासी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची आहेत.

मुलांना शिकविण्यासाठी संस्थेचा पुढाकार

प्रशासनाची ही उदासीनता पाहून गोविंद नारायण पाटील ही सामाजिक संस्था पुढे आली आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी त्यांनी कामण येथे नववीचा वर्ग स्वखर्चाने सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्हा परिषदेने वर्ग दिल्यास शिक्षक आणि इतर खर्च संस्था करेल, असे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी कळवले आहे. तसे पत्र त्यांनी दिले आहे. त्याला परवानगी मिळाली तर या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचू शकणार आहे.

यंदाच ही समस्या निर्माण झाली आहे. यंदा आठवीच्या तुकडय़ा वाढवल्याने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. या विद्यार्थ्यांची विनामूल्य शिकवणी घेऊन त्यांना दहावीच्या परीक्षेला बसवण्याचा एक विचार आहे. याशिवाय इतर खासगी शाळेत नववीची जादा तुकडी वाढवून या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. वसईत केवळ कामण येथे ही समस्या निर्माण झाली असली तरी संपूर्ण जिल्ह्यात मोखाडा, जव्हार या आदिवासी क्षेत्रात शेकडो विद्यार्थी अशा प्रकारे वंचित राहत आहेत.

शीतल पुंड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

मागच्या वर्षीही ही परिस्थिती उद्भवली होती. आम्ही पालकांना वालीव आणि जूचंद्र येथील शाळेत प्रवेश देण्यासाठी तयार होतो, पण ते दूर असल्याने पालकांनी नकार दिला. इतर शाळांमध्ये पटसंख्या वाढवून विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करावा, असे शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी आवाहन केले आहे.

चेतना मेहेर, सभापती, पंचायत समिती

ही अतिशय चिंताजनक बाब आहे. दर वर्षी जिल्ह्यात शेकडो विद्यार्थी अशा प्रकारे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याला जिल्हा परिषदेचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे. या विद्यार्थ्यांची दहावीपर्यंत व्यवस्था करण्याची नैतिक जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे.

सुशांत पाटील, अध्यक्ष, भूमिपुत्र रोजगार हक्क संरक्षण समिती