सेवा रस्त्यामुळे काम रखडले; जिकिरीच्या प्रवासामुळे ठाणेकरांमध्ये असंतोष 

नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या नितीन चौकात सिग्नल यंत्रणा सुरूकरण्यासाठी वाहतूक विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा सुरू असलेल्या या चौकात सिग्नल उभारण्यात आले असले, तरी केवळ पिवळा दिवा लुकलुकत असल्याने नागरिक संभ्रमावस्थेत प्रवास करत आहेत. या चौकातील सेवा रस्त्यामधून महामार्गाला जोडणारी वाहतूक सुरूकरण्यात येणार असल्याने सिग्नलचे काम थांबले असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात येत आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या चौकात सिग्नल सुरूकरण्यास वाहतूक विभागातर्फे विलंब केला जात असल्याने या चौकातून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून कमालीचा असंतोष व्यक्त केला जात आहे.

[jwplayer XA2jiImS]

ठाण्यातील पूर्व द्रूतगती मार्गावरील नितीन कंपनी चौकात वागळे इस्टेट, मुंबई, घोडबंदर आणि ठाणे रेल्वे स्थानक या ठिकाणी ये-जा करण्यासाठी चार प्रशस्त रस्ते आहेत. या महामार्गाच्या बाजूलाच नागरिकांना प्रवासासाठी सेवा रस्त्यांची सुविधा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या चौकात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नल यंत्रणा नव्हती. सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे नितीन कंपनी चौकात अपघाताचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आल्यावर अखेरीस गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. मात्र अनेक महिने उलटूनही अद्याप सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होऊ शकलेली नाही. त्यामुळे अजूनही वाहनचालक इतर वाहनांचा अंदाज घेत प्रवास करत आहेत.

आठ दिवसांत सिग्नल यंत्रणा सुरूहोईल, असे वाहतूक विभागातर्फे काही महिन्यांपूर्वी सांगण्यात आले होते. मात्र आता सेवा रस्त्यावरून महामार्गाला जोडणारा रस्ता तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता तयार झाल्यावर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी माहिती ठाणे वाहतूक विभागातर्फे देण्यात आली. सेवा रस्त्यावर येणारी वाहने या मध्य भागात तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यावरून महामार्गाकडे वळवण्यात येणार आहेत. यासाठी सिग्नलच्या शंभर मीटर आधी सेवा रस्त्यावरून महामार्गाकडे वळवण्यात येणारी वाहतूक एकेरी ठेवण्यात येणार आहे.

या अतिरिक्त रस्त्यामुळे सेवा रस्त्यावरील चौकात चारही बाजूंनी होणाऱ्या वाहतूककोंडीला आळा बसेल. सेवा रस्त्यावर सिग्नल द्यावा लागणार नसून सिग्नलचा वेळ वाचेल, असे वाहतूक विभागातर्फे सांगण्यात आले.

सेवा रस्त्यावरून महामार्गाला जोडणारा रस्ता तयार करून देण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला आहे. महापालिकेतर्फे हा रस्ता तयार करून दिल्यावर अधिसूचना काढून सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

– संदीप पालवे, उपायुक्त, ठाणे वाहतूक विभाग

[jwplayer 9HbIieXn]