प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकृत शवविच्छेदक नाही

शवविच्छेदन करण्याची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्राकडे असल्याचे पालिकेने सांगितले होते.

संग्रहीत छायाचित्र

मृताच्या कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान

वसई-विरार महापालिकेची भिस्त शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावरच असली तरी या आरोग्य केंद्रात एकही प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे उघड झाले आहे. खासगी व्यक्तींकडून अयोग्य पद्धतीने शवविच्छेदन करून घेतले जात असून त्याचा आर्थिक भरुदड मृताच्या नातेवाईकांना उचलावा लागत आहे. आता वसईतील प्राथमिक आरोग्य केंद्र वसई महापालिका हद्दीच्या बाहेर नेण्या चा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून पालिकेसमोर नवीन समस्या उभी राहिली आहे.

वसई-विरार महापालिकेचे स्वत:चे शवागार आणि शवविच्छेदन केंद्र नसल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने नुकतेच दिले होते. शवविच्छेदन करण्याची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्राकडे असल्याचे पालिकेने सांगितले होते. सध्या वसईतील सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच होत असते. सध्या वसई तालुक्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रे ही शहरी भागात आणि चार प्राथमिक आरोग्य केंद्रे ही ग्रामीण भागात आहेत. याशिवाय विरार येथे शासकीय जिल्हा रुग्णालय आहे. महिन्याला दीडशेहून अधिक मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येते, परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही प्रशिक्षित आणि अधिकृत शवविच्छेदक नाही. त्यामुळे खासगी व्यक्तीकडून हे शवविच्छेदन करून घ्यावे लागते. एका मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी २५० ते ३०० रुपये खर्च येतो. त्यात सुई, कपडे, दोरा, ग्लोव्हज आणि इतर साहित्याचा समावेश असतो. मात्र खासगी शवविच्छेदक हे एका शवविच्छेदनासाठी दीड हजार रुपये आकारतात. ते पैसे मृताच्या नातेवाईकाला द्यावे लागतात.

 

सामाजिक कार्यकर्ते एच. एस. दसोनी यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. याबाबत त्यांनी आयुक्तांकडे पत्र पाठवून आधुनिक शवविच्छेदन केंद्र आणि शवागरे उभारण्याची मागणी केली आहे. वसई विरार महापालिकेने प्रस्तावित केलेल्या अत्याधुनिक शवविच्छेदनगृह आणि शवागराच्या जागेला सीआरझेड कायद्याच्या फटका बसल्याने ते काम रखडले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रे शहराबाहेर

वसईतीला नवघर, सोपारा, निर्मळ आणि चंदनसार ही प्राथमिक आरोग्य केंद्रे पालिका हद्दीच्या बाहेर नेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नवघरचे केंद्र रानगाव येथे, सोपाराचे केंद्र अर्नाळा येथे, तर चंदनसार येथील केंद्र डोलीव येथे नेले जाणार आहे. नवघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणच्या जागेची मोजणीदेखील करण्यात आली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण भागासाठी असतात. वसईत महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी ही प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित होती, परंतु पालिका स्थापन झाल्यानंतरही ही आरोग्य केंद्र शहरी भागात आहेत आणि त्याचा लाभ महापालिकेला मिळतो. मात्र पालिकेकडून काहीच सुविधा मिळत नाही. दररोज सरासरी तीन ते चार शवविच्छेदन करावे लागतात. महापालिकेने स्वत:चे शवविच्छेदन केंद्र उभारले किंवा प्रशिक्षित शवविच्छेदकांची पदे भरली तर ही समस्या सुटेल.

–  डॉ. बाळासाहेब जाधव, आरोग्य अधिकारी, वसई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: No authorized mortuary in primary health center of vasai

ताज्या बातम्या