scorecardresearch

कल्याण डोंबिवलीची करोना मुक्तीकडे वाटचाल; शुक्रवारी एकाही रुग्णाची नोंद नाही

महापालिका हद्दीत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करोनाचे सर्व नियम पाळले जात आहेत

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत शुक्रवारी करोना साथीचा एकही रुग्ण आढळून आला नाही. दोन वर्षाच्या करोना महासाथीच्या काळात प्रथमच पालिका हद्दीत शून्य करोना रुग्ण आढळून आल्याने ही शहरे करोना मुक्तीकडे वाटचाल करू लागली आहेत, अशी प्रतिक्रिया पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

पालिका हद्दीत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करोनाचे सर्व नियम पाळले जात आहेत. नागरीक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुख्यपट्टी, प्रतिबंधाचे सर्व नियम पाळतात. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे शहरात एकही करून रुग्ण आढळून न येणे हा आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले

देशात करोना महासाथ सुरू झाल्यानंतर १३ मार्च २०२० रोजी कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत कल्याण शहरात पहिला करोनचा रुग्ण आढळून आला होता. सुरुवातीला ५ ते ५० पर्यंत असलेली करोना रुग्णसंख्या दोन ते तीन हजारपर्यंत पोहोचली होती. शंभर ते दीडशे रुग्णांवर उपचार करणारी वैद्यकीय यंत्रणा कल्याण-डोंबिवली पालिकेकडे उपलब्ध होती. अचानक महासाथ आल्याने आणि ही साथ हाताळण्याचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना प्रशासनाने दोन वर्षात दोन ते तीन हजार रुग्णशय्या करोना रूग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या. ५०० अतिदक्षता विभाग, ८०० कृत्रिम शासन यंत्रणा उभारली. त्याचा फायदा पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या वेळी करोना रुग्णांना झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी करोना विषाणूचा नव्या व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळून आला. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन शहरातून दिल्लीमार्गे मुंबईतून डोंबिवलीत आला होता. त्याने करोना प्रतिबंधित लसीच्या दोन्ही मात्र घेतल्या नव्हत्या. ती व्यक्ती मरीन इंजिनियर होती. त्याच्यावर पालिकेच्या काळजी केंद्रात उपचार सुरू करण्यात आले.

त्यानंतर दुबईतून कल्याण मध्ये आलेल्या दोन जणांना आमायक्रोनची बाधा झाली होती. या सर्व रुग्णांना पालिकेच्या काळजी केंद्र ठेवण्यात आले होते. या रुग्णापासून शहरात नवीन विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष काळजी घेतली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालिका हद्दीत गुरुवारपर्यंत ५६ करोना रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी तीन रुग्ण आढळून आले होते. तर करोनामुळे मृत्यूंची संख्या शून्य होती. दररोज पालिका काळजी केंद्रातून २५ रुग्ण उपचार घेऊन घरी जात आहेत. आतापर्यंत एक लाख ६३ हजार करोना रुग्ण काळजी केंद्रातून उपचार घेऊन घरी गेले आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No corona patient was registered in kdmc area on friday abn