दहीहंडीचा दणदणाट आणि वाहतूक कोंडीतून सुटका झाल्याने समाधान

ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील प्रदीप सोसायटीलगतचा चौक दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी उत्सवी घणघणाटाने गजबजून जायचा. मनमानी पार्किंग, वाहनांची कोंडी, जागोजागी अडथळ्याने नागरिकांचे अक्षरश: हाल व्हायचे. त्यामुळे आयोजक आणि रहिवाशांमधील ‘संघर्ष’ ठरलेला असायचा. गेल्या वर्षी दुष्काळाचे कारण सांगून येथील आयोजकांनी दहीहंडी रद्द केली खरी, मात्र यंदा आयोजक काय करतात याविषयी रहिवाशांच्या मनात संभ्रम होता. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे का होईना आयोजकांनी उत्सव रद्द करण्याची घोषणा केली आणि सलग दुसऱ्या वर्षी येथील रहिवाशांनी एकत्र जमत आनंदाचा उत्सव साजरा केला.

ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष संस्थेकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात येत असे. शहरातील अंतर्गत वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा या रस्त्यावरील वाहतूक बंद करून हा उत्सव पोलीस आणि महापालिकेच्या आशीर्वादाने साजरा करण्यात येत असे. परिसरातील दुकाने आणि गृहसंकुलांचीही त्यामुळे कोंडी होत होती. इमारतीच्या परिसरात टाकण्यात आलेल्या मंडपामुळे सोसायटय़ांचे प्रवेशद्वार बंद केले जायचे. ध्वनिक्षेपकाच्या ढणढणाटामुळे रहिवाशांना त्रास व्हायचा तो वेगळाच. परिसरात उभ्या करण्यात येणाऱ्या जनरेटरच्या धुरांनी वायू प्रदूषणाचा धोका निर्माण होत होता. यावर पर्याय म्हणून काहींनी या काळात येथील राहती घरे सोडून बाहेर जाण्यासही सुरुवात केली होती. प्रदीप सोसायटीमधील अनेकांनी या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली होती. अखेर न्यायालयाने नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे निर्देश देऊन अशा अतिउत्साही मंडळांना फटकारले. त्यामुळे मागील वर्षी दुष्काळाचे कारण सांगून आयोजकांनी यातून माघार घेतली, तर यंदा न्यायालयाच्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर आयोजकांनी दहीहंडी उत्सव साजरा करणार नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे प्रदीप सोसायटीमध्ये गुरुवारी शांततेचा अनुभव रहिवाशांना येत होता. कोंडी नाही, प्रदूषण नाही, धिंगाणा नाही, डीजेचा त्रास नाही, यामुळे येथील रहिवाशी खुशीत होते.

आज आनंदाचा दिवस

गेली दहा वर्षांपेक्षाही अधिक काळापासून आमची कोंडी करणारा त्रास कमी झाल्यामुळे आज आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. हा दिवस आमच्या आयुष्यात येऊ नये म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात होतो. आता आम्हाला अशी कोणतीच काळजी घ्यावी लागत नाही आमची सुटका झाली

– साधना पटवर्धन

न्यायालयाचे आभार

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने सहमती देऊन रहिवाशांना या त्रासातून मुक्त केले त्याबद्दल न्यायालयाचे आणि न्यायव्यवस्थेचे मन:पूर्वक आभार. अशा प्रकारे रहिवाशांचा त्रास दूर करणाऱ्या या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट झाला आहे.  आज आम्ही शांततेची दहीहंडी साजरी केली.

– हरिश्चंद्र विशे,

ज्येष्ठांचा त्रास संपला

दहीहंडी उत्सवातील अतिरेकीपणाचा सर्वाधिक त्रास या भागातील वृद्धांना होत होता. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना घरी नेमके परत कसे यायचे हेच सुचत नसायचे, त्यामुळे ते चुकत असत. दिवसभर फिरून रात्री हे वृद्ध घरी पोहोचत होते. खूप त्रास होत होता आणि या वर्षी हा त्रास थांबल्यामुळे आम्हाला शांततेचा अनुभव मिळत आहे.

– निलांबरी साठे,

हिडीस प्रकार बंद

येथील आयोजकांचा अतिरेकीपणा इतका वाढायचा, की परिसरातील एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतरही त्याची प्रेतयात्रा कुठून काढायची, असा प्रश्न आम्हाला पडला होता. या आयोजकांनी आमचे काहीच ऐकले नाही. नागरिकांच्या भावनांचा आदरही यांना राखता आलेला नव्हता. दु:खाच्या प्रसंगाचे भानही या मंडळींना नव्हते. हा हिडीस प्रकार बंद झाला हे चांगले झाले.

– नारायण काळे