परवानगीसाठी एकही अर्ज नाही; बारमालकांची ‘थांबा आणि पहा’ची भूमिका
डान्स बारवरील बंदी उठवल्यानंतर एके काळी डान्स बारसाठी प्रसिद्ध असलेल्या मीरा रोड परिसरातील बारमधून संगीताच्या बेधुंद तालावर थिरकणाऱ्या पावलांची छमछम पुन्हा ऐकण्यासाठी शौकिनांचे कान आतुर झाले आहेत परंतु त्यांची ही इच्छा सध्या तरी अपुरीच राहणार असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई शहरात डान्स बारसाठी परवाने मागणारे अनेक अर्ज आले असताना मीरा रोड परिसरातून मात्र अद्याप एकही अर्ज महसूल विभागाकडे दाखल झालेला नाही. ऑर्केस्ट्रा बारमधेच समाधानी असणारे बारमालक व डान्स बारप्रकरणी शासनाची भूमिकाही अद्याप स्पष्ट झाली नसल्याने मीरा-भाईंदरमधील बारमालकांनी थांबा आणि पाहा, अशी सावध भूमिका घेतली आहे.
मीरा रोड व विशेषत: मीरा-भाईंदरच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील डान्स बार छमछमसाठी खासकरून प्रसिद्ध होते. मुंबईच्या अगदी वेशीवर असल्याने शौकिनांची याच बारना पसंती असायची. गुन्हेगारी विश्वातील अनेक कटकारस्थानेही याच बारमधून शिजली गेल्याचेही बोलले जाते. सतत नावीन्याच्या शोधात असलेल्या बॉलीवूडच्या नजरेतूनही इथले डान्स बार सुटले नाहीत. अनेक चित्रपटातून डान्स बार म्हटले की मीरा-रोडचा उल्लेख हमखास होत असे. अशा या मीरा-भाईंदरच्या डान्स बारनी कोटय़वधी रुपयांची उलाढाल एके काळी केली आहे.
येथील डान्स बारशी इतर आर्थिक गणिते जुळलेली होती. येथे काम करणाऱ्या बारबाला मीरा रोडमध्येच भाडय़ाची घरे घेऊन राहत. केवळ मीरा रोडमधीलच नव्हे तर मुंबईतील डान्स बारमध्ये काम करणाऱ्या बारबालांचे वास्तव्यही मीरा रोडमध्येच होते. त्यामुळे केवळ गुंतवणूक म्हणून घेतलेल्या घरांना चांगलीच मागणी असायची, इस्टेट एजंटचीदेखील मोठी चलती होती. याव्यतिरिक्त बारबालांना नेण्या आणण्यासाठी वाहने, त्यांची कपडे व रंगभूषेच्या साहित्याची खरेदी अशी मोठी उलाढाल या व्यवसायाशी निगडित होती. मात्र २००५ साली आलेल्या डान्स बारबंदीनंतर येथील चित्रच पालटले. अनेक डान्स बारचालकांनी आपल्या बारचे रूपांतर ऑर्के स्ट्रा बारमध्ये केले. ४५ हून अधिक ऑर्केस्ट्रा बार आज मीरा-भाईंदर परिसरात सुरू आहेत. कित्येक बारमालकांनी तर व्यवसायाची दिशाच बदलली. अनेकांनी नुसती हॉटेल स्थापली तर काहींनी अन्य व्यवसायात गुंतवणूक केली.
अॉर्केस्ट्रा बारमध्ये समाधानी
आता डान्स बारला पुन्हा परवानगी मिळाल्यानंतर मीरा रोडमध्ये पुन्हा एकदा छमछम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र बारचालकांनी अद्यापही यासाठी उत्सुकता दाखवलेली नाही. बारचे परवाने मिळणाऱ्या तहसीलदार कार्यालयात यासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची माहिती तहसीलदार विकास पाटील यांनी दिली. डान्स बार बंद झाल्यानंतर बारमालक ऑर्केस्ट्रा बारमध्येदेखील खूश असल्याचेही यामागे कारण असल्याचे बोलले जाते. डान्स बारच्या आडून जे अनैतिक व्यवसाय सुरू होते. तेच व्यवसाय काही अॉर्केस्ट्रा बारमधून आजही सुरू आहेत.

बारचे स्वरूप बदलले, कृत्ये तीच..
ऑर्केस्ट्रा बारमधून केवळ गाण्याची परवानगी दिली गेली असताना मीरा-भाईंदरमध्ये दर एक-दोन दिवसांनी या बारमधून अश्लील कृत्ये सुरू असल्याच्या कारणावरून पोलिसांकडून कारवाई होत असते. शिवाय बारचा वापर पिक अप पॉइंट म्हणूनही केला जात आहे. गिऱ्हाइकांशी सौदा नक्की झाल्यानंतर ठरलेल्या लॉजचा अनैतिक व्यवसायासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे बारचे स्वरूप बदलले तरी त्यातील अनैतिक व्यवसाय जोरात सुरूच आहेत. यामुळेच कित्येक बारचालक डान्स बारची परवानगी घेण्यास उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे शासनही डान्स बार बंदीवरच ठाम आहे. त्यामुळे शासनाकडून याबाबत कोणती पावले उचलली जातात हे नक्की झाल्यानंतरच आपली पुढची दिशा ठरविण्याचा निर्णय बारमालकांनी घेतला आहे.