परिवहन विभागाचा रुग्णवाहिका चालकांना आदेश

कल्याण : करोना महामारीच्या पार्श्वभूमी वर रुग्णवाहिकांची गरज वाढली आहे. ही मागणी विचारात घेऊन रुग्णवाहिका चालकांनी रुग्ण, त्याच्या नातेवाईकांकडून मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दराप्रमाणेच भाडे आकारणी करावी, असे आदेश कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिले आहेत.

करोना महामारीमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्ण, नातेवाईक, रुग्णालये यांना रुग्णवाहिकांची सतत गरज लागते. अशा वेळी रुग्णांची गरज ओळखून त्यांना तात्काळ सेवा देण्यात यावी आणि परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे भाडे आकारणी करावी. रुग्णवाहिका मारुती व्हॅन असेल तर २५ किलोमीटर अंतरासाठी आणि दोन तासांच्या प्रवासाकरिता ७०० रुपये, दोन तासांहून अधिक कालावधी प्रवासाला लागला तर प्रत्येक किलोमीटरमागे १४ रुपये भाडे आकारणी करावी. टाटा सुमो, मॅटॅडोरसदृश वाहन असेल तर २५ कि.मी. आणि दोन तासांसाठी ८४० रुपये आणि त्या पुढील तासासाठी १४ रुपये वाढीव अशी आकारणी करावी. टाटा स्वराज, माझदा या प्रकारांतील रुग्णवाहिका २५ कि.मी.साठी आणि दोन तासांसाठी ९८० रुपये आणि पुढील दोन तासांनंतर कि.मी.मागे २० रुपये आकारतील. अतिदक्षता विभागासह वातानुकूलित रुग्णवाहिका असेल तर २५ कि.मी. आणि दोन तासांसाठी एक हजार १९० रुपये आणि त्यानंतरच्या दोन तासांनंतरच्या प्रवासासाठी कि.मी.मागे २४ रुपये आकारणी करतील. हे भाडेतक्ता पत्रक प्रत्येक रुग्णवाहिका चालक, मालकाने रुग्णवाहिकेत दर्शनी भागात लावावे.

हे भाडेदर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रापुरते मर्यादित आणि रुग्णाच्या ठिकाणापासून रुग्णालयापर्यंत पोहोचणे आणि परतण्याच्या प्रवासासाठीचे आहेत. रुग्णवाहिका एक तास थांबवावी लागत असेल तर त्यासाठी कोणताही भाडेदर नाही. मात्र, एक तासानंतर प्रतितास ५० रुपये भाडे आकारणी केली जाईल. २५ कि.मी.चे अंतर मोजताना परतीचे अंतर विचारात घ्यावे. या दराच्या व्यतिरिक्त कोणीही रुग्णवाहिका चालक वाढीव भाडे आकारणी करत असल्याच्या तक्रारी आल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिला आहे.