ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातमोजे, गमबूट तसेच इतर आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली साधनं पुरवली जात नसल्याची ओरड सुरू आहे. असं असताना नालेसफाईच्या कामासाठी वापरली जाणारी पद्धत कर्मचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत असल्याची एक चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. ज्यामध्ये काही नालेसफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून नालेसफाई करत आहेत. त्यांना नाल्यात उतरण्यासाठी हातमोजे अथवा गमबूट देखील पुरवला नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरंतर, नाल्यातील कचरा वाहून जावा यासाठी नाल्यात एकेठिकाणी पाणी अडविण्यात येते आणि मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्यानंतर ते सोडून देण्यात येते. हे काम नालेसफाई कामगारांकडून करण्यात येते. दरम्यान पाण्याच्या मोठ्या प्रवाहासोबत कचरा वाहून आल्यानंतर भेदरलेले कर्मचारी जीव वाचवण्यासाठी बाजुला उभ्या असलेल्या जेसीबीवर चढल्याचं चित्रफितीतून दिसून येत आहे. यामुळे नालेसफाईच्या कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठाणे महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. शहरातील नाल्यांमधील कचऱ्यांमुळे पावसाचे पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून ही खबरदारी घेण्यात येते. जून महिना उजाडल्यानंतरही नालेसफाईची कामे सुरुच असतात. दरवर्षीच्या तुलनेत यंदा एक महिना आधीच म्हणजेच मे ऐवजी एप्रिल महिन्यात नालेसफाईची कामे सुरू करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे स्वत: नाले सफाईच्या कामांची पाहाणी करून आढावा घेत आहेत. असे असले तरी नालेसफाईची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातमोजे, गमबूट तसेच इतर आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली साधने पुरविली जात नसल्याची ओरड आहे. यासंबंधित छायाचित्र आणि चित्रफित समाजमाध्यांवर प्रसारित होत आहे. यामुळे पालिकेच्या कारभारावर टीका होत आहे. संबंधित व्हिडीओ हा लोकमान्य – सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या आईमाता चौकातील नालेसफाई कामाचा आहे. कोणतीही सुरक्षितेची काळजी न घेता कर्मचाऱ्यांना नाल्यात उतरविलं जात आहे.

हे कर्मचारी नाल्यातील कचरा एकेठिकाणी जमा करून पाणी अडवितात आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर ते सोडून देतात. त्यामुळे तुंबलेल्या पाण्यासोबत कचरा वाहून जातो. यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यानंतर नालेसफाई कर्मचारी जवळच उभ्या असलेल्या जेसीबीवर चढले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No gumboots or no safety hand gloves for sewer workers thane municipal corporation viral video rmm
First published on: 23-05-2022 at 16:47 IST